वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये दैनंदिन वापराची औषधे आणि अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य यांचा तुटवडा !

संबंधितांनी ही समस्या लवकर सोडवावी, ही अपेक्षा ! कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर दैनंदिन वापराची औषधे आणि अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य यांचा तुटवडा रुग्णालयांमध्ये असणे अतिशय गंभीर आहे. जनतेच्या जिवाशी खेळणार्‍या संबंधित असंवेदनशील अधिकार्‍यांना कठोर शिक्षा करा !

पुणे – राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये दैनंदिन वापराची औषधे आणि अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य यांचा तुटवडा मागील २ मासांपासून निर्माण झाला आहे. याविषयी महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना वेळोवेळी निवेदन देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने केली आहे. (‘मार्ड’ने अशा प्रकरणात त्वरित पुढील पाऊल उचलणे अपेक्षित आहे ! – संपादक)

महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) यांच्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. पायभूत सुविधा नसल्याने रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांकडून व्यक्त होणारी नाराजी किंवा संताप यालाही अनेकदा निवासी डॉक्टरांनाच सामोरे जावे लागते. पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे ससून रुग्णालय आणि लातूर येथील विलासराव देशमुख गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे रुग्णालय ही दोन रुग्णालये सोडल्यास राज्यात सर्वत्र हा तुटवडा असल्याचे सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्‍वर ढोबळे-पाटील यांनी म्हटले आहे. सरकार आणि आरोग्य विभागाने तातडीने यात लक्ष घालावे, अशी मागणीही डॉ. ढोबळे-पाटील यांनी केली आहे.