भारतीय परंपरेत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अग्निहोत्र विधीला ‘पेटंट’ !

प्रत्येकाने येणार्‍या आपत्काळासाठी अत्यंत उपयुक्त असा अग्निहोत्र विधी शिकणे आवश्यक !

बेळगाव – भारतीय परंपरेमध्ये महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अग्निहोत्र या विधीवर आधारित प्रयोगाला ‘पेटंट’ मिळाले आहे. हे ‘पेटंट’ मिळवण्यासाठी बेळगावचे सुपुत्र डॉ. प्रमोद मोघे, तसेच त्यांचे सहकारी प्रणय अभंग आणि गिरीश पठाणे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. अग्निहोत्र या विधीचा शास्त्रीय, तसेच प्रायोगिक तत्त्वावर अभ्यास करून या तिघांनीही त्यातून निघणार्‍या धुराचे वातावरणात होणारे परिणाम, तसेच राखेची उपयुक्तता, जलशुद्धीकरणासाठी राखेचा वापर यांसंदर्भात महत्त्वाचे संशोधन करून प्रयोगशाळेत सिद्ध केले.

या सर्व प्रायोगिक संशोधनासाठी पुणे येथील प्रज्ञा विकास मंचच्या फ्रास्ट संस्थेने पुढाकार घेऊन अर्थसाहाय्य केले. प्रयोगाअंती अग्निहोत्र राख ही जंतूनाशक असून जलशुद्धीकरणासाठी तिचा उपयोग होतो हे जगासमोर सिद्ध करून जागतिक ‘पेटंट’ मिळवले. (अग्निहोत्र या विषयासाठी आता केंद्र सरकारने पुढाकार घेऊन त्याची उपयुक्तता लक्षात घेता देशपातळीवर अग्निहोत्र होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे सामान्यांना वाटते ! – संपादक)