दळणवळण बंदीच्या काळात चालू झालेल्या सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ सत्संगांविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले अभिप्राय आणि त्यांना आलेल्या अनुभूती
सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने…
कोरोना महामारीमुळे आलेला आपत्काळ आणि त्यामुळे केलेल्या दळणवळण बंदीच्या काळात सर्व व्यवहार अन् दैनंदिन जीवन ठप्प झाले होते. लोक घाबरले होते. त्यांना मानसिक आधाराची आवश्यकता होती. अशा वेळी सनातन संस्थेने ‘ऑनलाईन’ सत्संग चालू केले. त्याचा समाजातील पुष्कळ लोकांना लाभ झाला. अनेक जण साधना, काही जण सेवा करू लागले, तर अनेकांना सुंदर अनुभूतीही आल्या. त्यामुळे लोकांच्या मनात सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी आदरभाव निर्माण झाला. ३.४.२०२१ या दिवशी या सत्संगांना एक वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी व्यक्त केलेले अभिप्राय येथे दिले आहेत.
१. सौ. माया पाटील
१ अ. सत्संग ऐकून नामजप चालू केल्यावर निराशा दूर होऊन कुठल्याही परिस्थितीत स्थिर रहाता येऊ लागणे : आमच्या घरात अनेक अडचणी आणि सतत त्रासदायक वातावरण असल्याने मी बरीच निराश असायचे. दळणवळण बंदीच्या काळात मी प्रतिदिन भावसत्संग ऐकू लागले. त्या काळात आमच्या इमारतीतील आम्ही सर्व जण सकाळी आणि रात्री १ घंटा नामजप करायचो. त्यानंतर माझ्यात पुष्कळ पालट झाले. घरातील परिस्थिती कशीही असली, तरी मला स्थिर रहाता येऊ लागले. ‘नामजप’ हाच सगळ्यावरील उपाय आहे’, असे मला सत्संगात शिकायला मिळाले. त्याचप्रमाणे ‘सण कसे साजरे करायला हवेत ?’, हेही शिकायला मिळाले आणि त्याप्रमाणे कृतीही झाली.
२. सौ. मानसी बावडेकर
२ अ. सत्संग ऐकू लागल्यावर रागीटपणा न्यून होऊन स्थिर रहाता येणे, भाव वाढल्यामुळे पूजा आणि सणवार भावपूर्ण करता येणे : मला पूर्वीपासून साधनेची आवड होती; पण शास्त्र ठाऊक नव्हते. दळणवळण बंदीच्या काळात मी सत्संगाला उपस्थित राहू लागले आणि माझ्यासाठी एक मोठे दालनच उघडले गेलेे. एकही दिवस न चुकता मी हे सत्संग ऐकत आहे. त्यामुळे माझ्यातील रागीटपणा न्यून झाला आहे. पूर्वी एखादा प्रसंग घडला, तर मी लगेच अस्वस्थ व्हायचे; पण आता तसे होत नाही. मला स्थिर रहाता येते. ‘देवपूजा करतांना प्रत्यक्ष देव समोर आहे’, असा माझा भाव असतो. आता मला सगळे सणवार अत्यंत भावपूर्ण रितीने साजरे करता येत आहेत. हे सर्व पालट या सत्संगामुळेच झाले आहेत.
३. सौ. पुष्पा यंगारे, इचलकरंजी
३ अ. सत्संग ऐकू लागल्यापासून भीती न्यून होऊन घरात शांत वाटणे आणि ‘गुरुदेवच काळजी घेत आहेत’, असे जाणवणे : माझे यजमान सैन्यात असल्याने मी माझ्या लहान मुलांना घेऊन आईसमवेत इचलकरंजी येथे रहाते. आधी मला पुष्कळ भीती वाटायची. सत्संग चालू झाल्यापासून मनातील भीती न्यून होऊन पुष्कळ शांत वाटत आहे. आधी घरात फार त्रास जाणवायचा. आता घरात समाधान वाटते. मला ‘भावसत्संग ऐकतच रहावा’, असे वाटते. मी भावसत्संग कधीही चुकवत नाही. ‘गुरुदेवच माझी काळजी घेत आहेत’, असे मला जाणवते.
४. सौ. आसावरी एरंडे, वाचक, राजारामपुरी
४ अ. सत्संग ऐकायला लागल्यापासून भावपूर्ण नामजप होऊन आनंद अनुभवता येणे : सत्संग ऐकायला लागल्यापासून देवाची पूजा आणि आरती भावपूर्ण केली जाते. नामजप करतांना देवाचे स्मरण करून तो मनापासून होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. नामजप आतून होत असून मन अतिशय शांत होऊन आनंद अनुभवता येत आहे. यापूर्वी माझा इतका भावपूर्ण नामजप कधीही होत नव्हता.
५. सौ. आरती होनमाने, इचलकरंजी
५ अ. भावपूर्ण कृती केल्यामुळे घरात पुष्कळ पालट जाणवणे : मी प्रतिदिन सत्संग ऐकते आणि नामजप करते. प्रत्येक कृती भाव ठेवून केल्यामुळे घरात पुष्कळ पालट झाला आहे. ‘घराची शुद्धी करणे आणि चंडीकवच ऐकणे’, यांमुळे घरात पुष्कळ प्रसन्न वाटते.
६. वैशाली अविनाश सुतार, इचलकरंजी
६ अ. ‘नामजपाला भावाची जोड कशी द्यायची ?’, ते शिकता येऊन नामजप अधिक चांगला होणे : मी पूर्वीपासून नामजप करते; पण ‘नामजपाला भावाची जोड कशी द्यायची ?’, हे मला ठाऊक नव्हते. भावसत्संगामुळे मला ते शिकायला मिळाले. त्यामुळे आता नामजप पुष्कळ चांगला होतो आणि ‘तो कधी पूर्ण झाला’, तेही कळत नाही.
७. सौ. अरुणा पाटील, चंदूर, इचलकरंजी
७ अ. सत्संग ऐकल्यामुळे नामस्मरणात सातत्य रहाणे : नियमित सत्संग ऐकल्यामुळे ‘घरातील वस्तूंप्रती आत्मीयता कशी असावी ?’, ते मला समजले. या सत्संगांतून सणांची सखोल माहिती मिळते आणि तसे प्रयत्न केल्याने समाधानही मिळते. सतत नामस्मरणात रहाता येते.
८. सौ. लीला पाटील, गडहिंग्लज
मी आणि माझी मुलगी प्रतिदिन सत्संग ऐकतो अन् त्यातील सूत्रे वहीत लिहून घेतो. आम्ही सत्संगात सांगितलेल्या सूत्रांप्रमाणे कृती करतो.
९. सौ. सुगंधा गायकवाड
९ अ. सनातन संस्थेविषयी मनात अपसमज असणे, सत्संग ऐकू लागल्यावर ते दूर होऊन नामजपाची ओढ निर्माण होणे आणि यजमानांना मागील ३० वर्षांपासून असलेले दारूचे व्यसन सुटणे : ‘सनातनवाले देवाच्या विरुद्ध काहीतरी सांगतात’, असा माझा अपसमज होता. नंतर मी या संस्थेच्या संपर्कात आले. तेव्हा ‘मी किती चुकीच्या समजूतीत होते ?’, हे माझ्या लक्षात आले. दळणवळण बंदीच्या काळात मी दुपारचा भावसत्संग ऐकायला लागले. सत्संग ऐकल्यावर मला पुष्कळ उत्साह वाटायचा आणि मनात नामजप करायची ओढ निर्माण व्हायची. मागील ७ – ८ मासांपासून मी नियमित सत्संग ऐकते. मी संस्थेच्या वेगवेगळ्या सत्संगांनाही उपस्थित रहाते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे मागील ३० वर्षांपासून माझ्या यजमानांना असलेले दारूचे व्यसन देवाच्या कृपेने गेल्या दीड मासापासून बंद झाले आहे. ‘हे सर्व सत्संगामुळे झाले’, असे मला वाटते.
१०. अरुणा कुरणे
१० अ. सत्संग ऐकून मानसिक आणि शारीरिक विकार, तसेच स्वभावदोष न्यून होणे अन् हे अनमोल सत्संग उपलब्ध करून दिल्याविषयी गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता वाटणे : सनातन संस्थेचे हिंदु धर्माची महानता सांगणारे आणि भक्तीभाव वाढवणारे सत्संग मी ऐकते. हे सत्संग ऐकल्यामुळे ‘साधना’ सत्संगामध्ये जे काही शिकवतात, ते मला जलद गतीने ग्रहण करता येतेे. त्याचा मला पुष्कळ लाभ झाला आहे. एक मास मी बालसंस्कार वर्ग घेतला होता. त्या वेळी सनातन संस्थेचे ‘यू ट्यूब’वरील बालसत्संग ऐकून मी त्याचे मराठीत भाषांतर करून मुलांना सांगत होते आणि त्यांच्याकडून नामजप करवून घेत होते. सत्संग ऐकल्यामुळे मला योग्य मार्गाने साधना करता आली. माझ्या अनेक मानसिक अणि शारीरिक विकारांची तीव्रता न्यून झाली आहे. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया चालू करण्यापूर्वीच माझ्या स्वभावात पुष्कळ पालट झाला आहे. गुरुमाऊलींनी आमच्यासाठी हे सत्संग उपलब्ध करून दिले, त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
११. सौ. मयुरी भगतसिंग चौगुले, बांबवडे, मलकापूर
११ अ. घरातील सर्व कामे करतांना भावाची जोड दिल्यामुळे कामे लवकर होऊन आनंदी रहाता येणे आणि नामजप करतांना किंवा सत्संग ऐकतांना शेषशायी श्रीविष्णूचे दर्शन होणे : माझा नामजप दिवसभर चालू असतो. मी स्वयंपाक करतांना ‘मी श्रीकृष्णासाठी स्वयंपाक करत आहे’, तर घरातील केर काढतांना मी ‘श्रीकृष्णाचे द्वार स्वच्छ करत आहे’, असा भाव ठेवते. याच प्रकारे दिवसभरातील प्रत्येक कृती करत असतांना भाव ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे काम लवकर होते आणि मला आनंदी रहाता येते. ‘मी भावसत्संग ऐकते, तेव्हा मला ‘भगवान श्रीविष्णु शेषनागाच्या शय्येवर निद्रिस्त असून माता श्री महालक्ष्मी त्याचे पाय चेपत आहे. मी श्रीविष्णूच्या चरणी फुले अर्पण करून प्रार्थना करत आहे अन् तो मला आशीर्वाद देत आहे’, असे जाणवते. मी नामस्मरण करतांनाही मला हे दृश्य दिसते.
१२. डॉ. संकपाळ, इचलकरंजी
१२ अ. सत्संग ऐकू लागल्यानंतर रक्तदाबाची आणि भीती वाटण्यावरील गोळी न्यून होणे : मी २ मासांपासून सत्संग बघत आहे. त्यामुळे माझी उच्च रक्तदाबाची १ गोळी न्यून झाली आहे. आता माझी भीतीही न्यून झाली असून त्यासाठी घेत असलेली गोळीही बंद झाली आहे. माझा नामजप चालू झाला असून चिडचिडेपणा कमी झाला आहे. हे सर्व पालट फारच छान आहेत.
१३. श्री. सचिन कुलकर्णी, उद्योजक
१३ अ. सत्संग ऐकल्यावर निद्रानाशाचा त्रास दूर होऊन चांगली झोप लागणे : ‘धर्मसंवाद सत्संगा’त प.पू. गुरुदेवांचे सांगितलेले अनुभव ऐकतांना मला अतिशय चांगले वाटले. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शनही पुष्कळ चांगले वाटले. ते ऐकतांना माझे मन एकाग्र झाले होते. मला बर्याच वर्षांपासून झोपेचा त्रास आहे. अनेक वर्षांनी मला चांगली झोप लागली.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |