पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज आणि पू. सौरभ जोशी यांची भावभेट !
१. पू. सौरभदादांनी पू. बांद्रे महाराज यांचे ‘जय हो !’ असा जयघोष करून स्वागत करणे
‘२६.३.२०२१ या दिवशी पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पू. सौरभदादांना (सनातनचे बहुविकलांग संत पू. सौरभ जोशी) भेटायला आले होते. पू. बांद्रे महाराज खोलीत आल्यावर पू. सौरभदादांनी ‘जय हो !’ असा मोठ्याने जयघोष करून त्यांचे स्वागत केले आणि सर्वांना खाऊ देण्यास सांगितला.
२. पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी पू. सौरभ जोशी यांच्याविषयी काढलेले कौतुकोद्गार !
२ अ. ‘पू. सौरभदादांसारख्या संतांची भेट होणे’, हे भाग्य ! : पू. बांद्रे महाराज पू. सौरभदादांना बघून म्हणाले, ‘‘मी अनेक वेळा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पू. सौरभदादांविषयी वाचले आहे. त्यांचे छायाचित्र पाहिले आहे. आज मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे पू. सौरभदादांना भेटण्याचा योग आला. ‘पू. सौरभदादांसारख्या संतांची भेट होणे’, हे आमचे भाग्य आहे.
२ आ. साधनेमुळे देहबुद्धी नाहीशी झालेले पू. सौरभदादा ! : साधनेमुळे देहबुद्धी नाहीशी होते. पू. सौरभदादा याचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांना देहाची जाणीव नसल्याने शरिराला काही झाले, तरी त्याचे त्यांना काही वाटत नाही. आपल्याला जरा काही झाले, आजारपणामुळे २ – ४ दिवस झोपावे लागले, तर आपली स्थिती कशी होते ? पू. सौरभदादा २५ वर्षे या स्थितीत असूनही आनंदी आणि तेजस्वी आहेत. यातूनच त्यांचे अलौकिकत्व लक्षात येते.
२ इ. त्यांना कशाचीही चिंता नाही. त्यांनी सर्व देवावर सोडले आहे.
२ ई. जीव आणि शिव यांचा संगम : पू. सौरभदादा म्हणजे जीवात्मा आणि शिवात्मा एकरूप झाल्याचे उदाहरण आहे. ते सतत आनंदात असतात. त्यांच्याकडे भक्तीभाव असलेला मनुष्य आला की, त्यांना पुष्कळ आनंद होतो.
२ उ. पू. सौरभदादांच्या सेवेत असणारे साधक पुष्कळ भाग्यवान आहेत. अशा संतांची सेवा करायला मिळणे दुर्लभ आहे.
३. अशा जिवाला ओळखणारे केवळ परम पूज्यच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) आहेत.
४. प्रार्थना
प.पू. गुरुमाऊली, तुम्ही एकदा म्हटले होते, ‘‘पू. सौरभदादा किती मोठे संत आहेत ! तुम्ही किती उच्च कोटीच्या संतांची सेवा करत आहात.’’ प.पू. गुरुमाऊली, तुमच्या कृपेनेच आम्हाला अशा उच्च कोटीतील संतांची सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. ‘आमच्याकडून ही सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण व्हावी’, यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या’, अशी आम्ही आपल्या सुकोमल चरणी अनन्य शरणागतभावाने प्रार्थना करतो.’
– श्री. संजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.४.२०२१)