बुलढाणा येथे सैलानी बाबांच्या यात्रेत गर्दी केल्याच्या प्रकरणी १ सहस्रांहून अधिक जणांवर गुन्हे नोंद !
संदल काढल्याच्या प्रकरणी पोलिसांकडून सौम्य लाठीमार !
कोरोनाच्या आपत्काळात दायित्वशून्यपणे वागणारे असे नागरिक भीषण आपत्काळात काय करतील, याची कल्पनाच न केलेली बरी !
बुलढाणा – शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पिंपळगाव सराई परिसरात भरणार्या सैलानी यात्रेसह नारळाची होळी आणि संदल काढण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली होती; परंतु या बंदी आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत २ एप्रिलच्या रात्री सहस्रों भाविकांच्या उपस्थितीत संदल काढण्यात आला. त्यामुळे रायपूर पोलिसांनी १ सहस्र भाविकांवर गुन्हे नोंद केले आहेत, तसेच संदलच्या दिवशी सैलानीत गर्दी करणार्या भाविकांवर पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला.
सैलानी येथे प्रतिवर्षी मार्च मासात सैलानीची यात्रा भरते. होळीच्या सणापासून या यात्रेला प्रारंभ करण्यात येतो. होळीच्या दिवशी या यात्रेत शेकडो नारळांची होळी पेटवण्यात येते. नारळाची होळी पेटवण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून सहस्रों भाविक सैलानीत येतात, तर होळीच्या पाचव्या दिवशी पिंपळगाव सराई येथून सैलानी बाबांचा संदल काढण्यात येतो. या दिवशी संदलमध्ये सहभाग घेण्यासाठी राज्यासह परराज्यातील लाखो भाविक सैलानीत येतात.
विशेष म्हणजे नारळाची होळी आणि संदलच्या दिवशी लोकांनी गर्दी करू नये, यासाठी सैलानीकडे येणारे प्रमुख मार्ग बंद करण्यात आले होते; मात्र तरीही ३ एप्रिल या दिवशी सहस्रों लोक सैलानीत आले होते. या वेळी काही मुजावर आणि भाविक यांच्या उपस्थितीत सैलानी बाबांचा संदल काढण्यात आला. त्यांनतर पोलिसांनी शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपी शेख रफिक शेख करीम, शेख शफीक शेख करीम, हाजी हाशम शेख हबीब, शेख नजीर शेख कासम, शेख चांद शेख हबीब, शेख कदीर शेख नईम, शेख असलम शेख जहीर, शेख राजू शेख शहजाद यांच्यासह एक सहस्रांहून अधिक भाविकांवर गुन्हे नोंद केले आहेत. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे हे करत आहेत.