अनिल देशमुख यांचे गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र दिले.

अनिल देशमुख यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले असून मुख्यमंत्र्यांनीही त्यांचे त्यागपत्र स्वीकारले आहे. त्यागपत्र देण्यापूर्वी अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पदाचे त्यागपत्र देत असल्याची माहिती त्यांना दिली. शरद पवार यांच्या अनुमतीनंतर देशमुख यांनी पदाचे त्यागपत्र दिले. ‘केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अन्वेषण चालू असतांना मंत्रीपदावर रहाणे नैतिकतेला धरून रहाणार नाही. त्यामुळे मी पदाचे त्यागपत्र देत आहे’, असे अनिल देशमुख यांनी त्यागपत्रात म्हटले आहे.

परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांची सी.बी.आय. चौकशी करा ! – मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. चौकशीचा अहवाल १५ दिवसांत सादर करून गुन्हा नोंद करायचा कि नाही, याचा निर्णय केंद्रीय अन्वेषण विभागाने घ्यावा, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. अधिवक्ता जयश्री पाटील यांच्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपिठाच्या समोर ही सुनावणी झाली. गृहमंत्र्यांवरील आरोपांविषयी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी व्हावी, यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही केली होती.

‘पोलिसांच्या नियुक्त्या आणि स्थानांतर यांसाठी अनिल देशमुख पैशांची मागणी करतात, तसेच अन्वेषणात हस्तक्षेप करतात’, असे आरोप परमबीर सिंह यांनी याचिकेत केले होते.

‘हे आरोप सेवेशी संबंधित असल्याने त्यांनी योग्य त्या यंत्रणेकडे न्याय मागावा’, असे नमूद करत न्यायालयाने परमबीरसिंह यांची याचिका फेटाळून लावली होती.

त्यानंतर अधिवक्त्या जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात गृहमंत्र्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली; मात्र त्यावरही कारवाई न झाल्यामुळे पाटील यांनी न्यायालयात पुन्हा याचिका केली. त्यामुळे पाटील यांच्या याचिकेवर ‘राज्याच्या गृहमंत्र्यांच्या विरोधात आरोप आहेत. त्यामुळे त्यांच्या याचिकेकडे दुर्लक्ष करू शकत नाही’, असे नमूद करत न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारली.

दिलीप वळसे पाटील हे महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री !

मुंबई – गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा, असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा, असेही या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटील हे राज्याचे नवे गृहमंत्री ठरले आहेत.

दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याविषयीही पत्रात विनंती करण्यात आली आहे. ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.