हरिद्वार येथील सप्तसरोवर मार्गावर पेशवाईंचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने स्वागत !
हरिद्वार, ५ एप्रिल (वार्ता.) – सनातन संस्थेसह हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री आदिनाथ आखाड्याच्या पेशवाईचे (मिरवणूक) स्वागत सप्तसरोवर मार्गावर करण्यात आले. या पेशवाईमध्ये श्रीआदिनाथ आखाड्याचे महामंडलेश्वर योगीक्षील महाराज, पिठाधिश्वर श्रीत्रिलोकीनाथजी महाराज (श्रीनाथ बाबाजी), अन्य महामंडलेश्वर, महंत आणि भक्तगण सहभागी होते.
श्रीआदिनाथ आखाड्याच्या हरिपूर कला येथील श्री सिद्धलोक आश्रम येथून ‘हरकी पौडी’पर्यंत ही पेशवाई (मिरवणूक) काढण्यात आली. या वेळी महाराजांचे शेकडो भक्तगण मिरवणुकीत सहभागी झाले होते. या पेशवाईचे शदाणी दरबार आश्रमासमोर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी श्रीआदिनाथ आखाड्याचे महामंडलेश्वर योगीक्षील महाराज, पिठाधिश्वर श्रीत्रिलोकीनाथजी महाराज (श्रीनाथ बाबाजी), अन्य महामंडलेश्वर यांना पुष्पहार घालून त्यांचे आशीर्वाद घेतले. या पेशवाईच्या वेळी सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी उपस्थित साधूसंतांचे आदरपूर्वक विनम्रतेने स्वागत केले.