पुणे महानगर परिवहन (पी.एम्.पी.) सेवा बंद केल्याने प्रवासी संघटनांनी केला निषेध !
पुणे – ३ एप्रिलपासून पुढील ७ दिवसांसाठी सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी आणि दिवसा जमावबंदी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असून यामध्ये पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक करणारी पुणे महानगर परिवहन मंडळाची (पी.एम्.पी.एल्.) सेवा बंद करण्यात आली आहे. याचा प्रवासी संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांचे हाल होणार असून ते होऊ नयेत म्हणून मर्यादित स्वरूपात ही सेवा चालू ठेवावी, अशी संघटनांनी मागणी केली आहे.
प्रतिदिन ६ ते ७ लाख प्रवासी पी.एम्.पी.ने प्रवास करतात. या प्रवाशांच्या सोयीसाठी अन्य पर्याय उपलब्ध नाहीत, या परिस्थितीत नागरिकांनी काय करावे ?, असा प्रश्न पी.एम्.पी.एल्. प्रवासी मंचाचे सचिव संजय शितोळे यांनी उपस्थित केला. पी.एम्.पी. सेवा बंद केल्यामुळे कामगारांची गैरसोय होणार आहे. कामगार जर कामावर आले नाहीत, तर त्याचा परिणाम उद्योगांवर होणार आहे, असे मत फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी व्यक्त केले आहे.