ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे १२५ कोरोनाबाधित कामगारांचे पुणे येथील ‘लेबर कॅम्प’मधून पलायन !
जनतेचे आरोग्य धोक्यात घालणार्या अशा दायित्वशून्य ठेकेदारावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.
फुरसुंगी (पुणे) – येथील ‘एस्.पी. इन्फोसिटी’ आस्थापनाच्या बांधकाम इमारतीवर काम करणार्या १७६ कोरोनाबाधित श्रमिकांपैकी १२५ कामगार ‘लेबर कॅम्प’मधून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व श्रमिक बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश येथे त्यांच्या मूळ गावी गेल्याची शक्यता असून, या घटनेमुळे ‘लेबर कॅम्प’च्या ठेकेदाराकडून पुन्हा एकदा निष्काळजीपणा झाल्याचे समोर आले आहे.
महापालिकेचे साहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर यांनी सांगितले की, ‘लेबर कॅम्प’वर ठेकेदाराने लक्ष ठेवणे आवश्यक होते; मात्र प्रारंभीपासून त्यांनी दुर्लक्ष केले आहे. प्रारंभी येथील ६ कामगार पळून गेले होते. त्यामुळे तात्काळ हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. त्यानंतरही ठेकेदाराने लक्ष दिले नसल्याने पुन्हा कामगार पळून गेल्याची माहिती मिळाली आहे. ही गोष्ट गंभीर आहे. बाधित मजुरांमुळे आणखी किती जणांना कोरोनाचा संसर्ग झाला, हे सांगणे अवघड झाले आहे.