फुरसुंगी (पुणे) येथील कचरा डेपोला १२ ते १५ एकरपर्यंत भीषण आग !
षड्यंत्र असल्याचा पालिकेवर आरोप
फुरसुंगी (पुणे), ४ एप्रिल – उरुळीदेवाची येथील ‘कचरा डेपो’ला २ एप्रिल या दिवशी दुपारी दीड वाजता १२ ते १५ एकरवर आग लागली होती. आगीचे स्वरूप भीषण होते. अनुमाने २ कि.मी. परिसरात धुराचे लोट पसरले होते. याच वेळी पुणे महापालिकेच्या घनकचरा प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही आग लावली असल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. तसेच ‘कचरा डेपो हटाव संघर्ष समिती’चे भगवान भाडळे यांनीसुद्धा हे षड्यंत्र असल्याचा पालिकेवर आरोप केला आहे.
‘ओपन डम्पिंग’ केलेला कचरा जिरवण्यासाठी ही आग लावली आहे. या ‘कचरा डेपो’च्या नावावर कोट्यवधी रुपये व्यय होत आहेत. २ घंट्यांत ही आग विझवली गेली पाहिजे. पुणे महापालिकेकडे तेवढी यंत्रणा नाही का ?, असा प्रश्न नगरसेवक गणेश ढोरे यांनी केला आहे.