गोव्यात दिवसभरात कोरोनाबाधित २६५ नवीन रुग्ण
३१ मार्चपासून प्रतिदिन आढळत आहेत २०० हून अधिक रुग्ण
पणजी, ४ एप्रिल (वार्ता.) – राज्यात ४ एप्रिल या दिवशी कोरोनाविषयक २ सहस्र ५७ चाचण्या करण्यात आल्या. यांपैकी २६५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची टक्केवारी १२.८८ झाली आहे, तर राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ सहस्र ७७ झाली आहे. ४ एप्रिलला कोरोनाचा संसर्ग झाल्याने फोंडा येथील एका रुग्णाचे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असतांना निधन झाले. रुग्णालयात भरती केल्यानंतर २४ घंट्यांच्या आत या रुग्णाचे निधन झाले. कोरोनाचा संसर्ग झाल्याने निधन पावलेल्यांची राज्यातील एकूण संख्या आता ८३५ झाली आहे. राज्यात पुढील आरोग्य केंद्रांमध्ये एकूण १०० हून अधिक रुग्ण आहेत. पर्वरी २०७, मडगाव २०६, पणजी १९९, फोंडा १८५, कांदोळी १५२, वास्को १२९ आणि कुठ्ठाळी येथे १०४ रुग्ण आहेत. राज्यात आलेले एकूण १७ प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत.