महाराष्ट्रात रक्त आणि प्लाझ्मा यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा ! – युवा रक्तदाता संघटना

 

राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे

सिंधुदुर्ग – कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यासाठी अधिकाधिक तरुणांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येणे काळाची आवश्यकता असल्याचे युवा रक्तदाता संघटनेने म्हटले आहे.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी ‘प्लाझ्मा’ देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. याची कोणत्याही क्षणी आवश्यकता भासत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या बर्‍याच रुग्णांसाठी ‘प्लाझ्मा’ देणारे शोधणे कठीण जात आहे. मुंबई, तसेच बांबोळी (गोवा) येथे ‘प्लाझ्मा’ देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाठवावे लागत आहेत. अशा कठीण प्रसंगी सर्व रक्तगटांच्या युवा रक्तदात्यांनी रक्तदानासाठी कायम कटीबद्ध रहात ‘रक्तदाता संघटना’ आणि संस्था यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून रक्तदान, प्लाझ्मा दान करून आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी केले आहे.