बेतुल किल्ल्यावर तिथीनुसार शिवजयंती साजरी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर अभिषेक
मडगाव, ४ एप्रिल (वार्ता.) – क्षत्रिय मराठा पारंपरिक मच्छीमार संघटना आणि शिवप्रेमी संघटना यांनी बेतुल किल्ल्यावर तिथीनुसार शिवजयंती साजरी केली. या वेळी बेतुल किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला आणि पुरोहितांच्या उपस्थितीत विधीवत् पूजनही करण्यात आले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. या वेळी क्षत्रिय मराठा पारंपरिक मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद जुवेकर, राजेंद्र केरकर, सज्जन जुवेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बेतुल किल्ल्याचा (जलदुर्गचा) इतिहास
वर्ष १६७२ मध्ये फोंडा कह्यात घेतल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी कारवारची मोहीम काढली. शिवेश्वर, कडवाड कद्रे, अंकोला ही ठाणी हस्तगत करून गंगावळी नदीपर्यंतचा आदिलशाहीत असलेला मुलुुुख त्यांनी स्वराज्यात आणला. पोर्तुगिजांच्या गोव्यातील राज्याची सीमा आता अशी झाली की, पश्चिमेस अरबी समुद्र आणि पूर्वेस अन् दक्षिणोत्तरकडे मराठी राज्य. महाराजांनी सासष्टी महालाजवळ बेतुल येथे साळ नदीच्या तिरावर एक जलदुर्ग बांधला. हाच ‘काब द राम’चा किल्ला किंवा ‘खोलगड’ होय. या दुर्गाच्या बांधकामात व्यत्यय आणायचा आणि तो मोडून टाकण्याचा सल्ला सल्लागार मंडळाने तत्कालीन पोर्तुगीज व्हाइरॉयला दिला होता; पण व्हाइसरॉयला ते धाडस करवले नाही. पोर्तुगिजांना भूमीवर वेढा घालून आपले बलवान आरमार समुद्रात उभे करून त्यांचा कोंडमारा करण्याचा महाराजांचा विचार असावा.