श्री सिद्धेश्वर मंदिराच्या जागेवर असलेले अतिक्रमण हटवले !
सोलापूर – श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर पंच कमिटीच्या अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला अखेर यश आले आहे. पंचकट्टा ते विजापूर वेस या मार्गावर मागील ५० वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. दिवाणी न्यायालयाने ही अतिक्रमणे काढण्याचा आदेश पारित केला आहे. न्यायालयाच्या या आदेशाची कार्यवाही करत ३ एप्रिल या दिवशी सक्तीने सर्व अतिक्रमणे हटवण्यात आली. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हे अतिक्रमण हटवण्यासाठी पंच कट्टा ते विजापूर वेस या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.
मुल्ला बाबा टेकडी येथील ८ गुंठे भूमी ही श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर देवस्थान समितीची आहे. धार्मिक रितीरिवाज येथे केले जातात; मात्र अतिक्रमणामुळे मंदिराचे धार्मिक कार्यक्रम करता येत नव्हते. श्री सिद्धेश्वर पंच कमिटीने दिवाणी न्यायालयात भूमीचे पुरावे सादर केले. न्यायालयाने मंदिराच्या जागेवर करण्यात आलेली अतिक्रमणे हटवण्याचा आदेश दिला आहे.