सकारात्मक अन् शिकण्याची वृत्ती असलेली आणि कुठेही गेली, तरी साधकत्वाला धरून वागणारी रामनाथी येथील कु. सानिका सुनील सोनीकर (वय १५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सानिका सुनील सोनीकर ही एक आहे !

फाल्गुन कृष्ण पक्ष सप्तमी (३.४.२०२१) या दिवशी कु. सानिका सुनील सोनीकर हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

(‘वर्ष २०१९ मध्ये कु. सानिका सुनील सोनीकर हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’ – संकलक)

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. सानिका सोनीकर

१. रामनाथी आश्रमात आल्यावर कु. सानिकाच्या साधनेची काळजी वाटणे आणि तिने त्याविषयी आश्‍वस्त करणे

‘४.८.२०१९ या दिवशी मी, यजमान आणि आमच्या दोन्ही मुली (स्नेहल अन् सानिका) साधना करण्यासाठी रामनाथी आश्रमात रहाण्यास आलो. तेव्हा मला सानिकाची पुष्कळ काळजी वाटायची. ती बालीशपणा करायची, तसेच मनाने आणि अती आत्मविश्‍वासाने कृती करायची.

रामनाथी आश्रमात माझा वाढदिवस साजरा केला. तेव्हा सानिकाने माझ्याविषयी केलेल्या कवितेत लिहिले होते,

‘गुरूंनी उचलली साधनेची जबाबदारी ।
नको करूस तू माझी काळजी ।
हो त्यांच्या चरणांची दासी ॥’

तेव्हापासून तिने स्वतःला पालटण्यासाठी तळमळीने प्रयत्न चालू केले. सानिकाचा स्वतःला पालटण्यासाठी पुष्कळ संघर्ष व्हायचा; मात्र तिने जिद्द आणि चिकाटी सोडली नाही. एकदा रामनाथी आश्रमात सद्गुरु राजेंद्रदादा आले असतांना ते यजमानांना म्हणाले, ‘‘सानिकाची काहीच काळजी करू नका. ती साधनेत पुष्कळ पुढे जाईल.’’ तेव्हा माझी ५० टक्के काळजी दूर झाली.

२. आत्याकडे राहिल्यानंतर सानिकाने केलेल्या सेवा !

२ अ. आत्याकडे रहायला गेल्यावर आश्रमाप्रमाणेे स्वयंपाकघरातील आणि इतरही कामे सेवाभावाने करणे : मध्यंतरी आम्ही काही दिवस सातारा येथे सानिकाच्या आत्याकडे राहिलो होतो. आश्रमातील भाज्या निवडण्याची पद्धत, उदा. प्रथम वापरणे, व्दितीय वापरणे, याप्रमाणे ती आत्याकडेही भाज्यांची वर्गवारी करून ठेवायची. ती आश्रमातील पद्धतीप्रमाणे भाजी चिरायची आणि घरातील आवरा-आवर करून सात्विक पद्धतीने मांडणी करायची. आश्रमात तिच्याकडे नैवेद्याचे पान वाढून देवाला नैवेद्य दाखवण्याची सेवा आहे. तिने आत्यालाही ‘नैवेद्य कसा वाढायचा आणि देवाला कसा दाखवायचा ?’, याविषयी सांगितले.

२ आ. ‘चूल आणि बंब कसा पेटवायचा?’, ते शिकून घेणे : एकदा आत्याकडे काही कारणास्तव ‘गॅस सिलेंडर’ आला नाही. त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करावा लागला. त्या वेळी तिने पुढाकार घेऊन चूल पेटवायला आणि बंबात पाणी तापवायला शिकून घेतले.

२ इ. आत्याकडे भरपूर झाडे लावलेली आहेत. ती त्यांची आत्मीयतेने काळजी घ्यायची. त्यांना पाणी घालायची.

२ ई. आत्याच्या दुकानातील वस्तूंच्या किंमती जाणून घेऊन दुकान सांभाळणे : तिच्या आत्याचे पार्लर आणि महिलांच्या दागिन्यांचे दुकान आहे. तिने आत्याकडून सर्व दागिने अन् ‘मेकअप’च्या वस्तू यांच्या किंमती जाणून घेतल्या आणि ती आत्याचे दुकानही सांभाळू लागली. ती दुकानातील वस्तूंची मांडणी सात्विक पद्धतीने करायची. ती आश्रमातील पद्धतीप्रमाणेच वेशभूषा करायची. ती ग्राहकांशी चांगल्या पद्धतीने बोलायची. तिचे सात्विक रहाणे आणि बोलणे याविषयी ग्राहक तिची आत्या आणि मामा यांना सांगायचे.

३. काही कारणाने सानिकाला रागावल्यावर तिने स्वतःमध्ये पालट करण्याचा प्रयत्न करणे

मी तिला रागवले, तरी ती नकारात्मक स्थितीत जात नाही, उलट स्वतःमध्ये पालट करण्याचा प्रयत्न करते. ती सतत उत्साही आणि आनंदी असते. ‘तिच्याकडे पाहिल्यावर तिच्याकडून सकारात्मक स्पंदने येतात’, असे मला जाणवते. मी गंभीर, शांत आणि उदास दिसले, तर ती माझ्याजवळ येऊन माझे गाल आणि केस यांवरून हात फिरवायची. त्या वेळी मला ‘प.पू. गुरुदेवांचाच हात फिरत आहे’, असे जाणवून माझे नैराश्य दूर व्हायचे आणि उत्साह वाढायचा. असा अनुभव मी बर्‍याच वेळा घेतला आहे.

४. एका साधिकेविषयी पूर्वग्रह निर्माण झाल्यावर भावाच्या स्तरावर प्रयत्न करून बाहेर पडणे

एकदा एका साधिकेविषयी तिला प्रतिक्रिया आल्या आणि तिच्याविषयी पूर्वग्रह निर्माण झाला. तिने मला याविषयी सांगितल्यावर मी तिला दृष्टीकोन दिल्यानंतर तिने प्रयत्न चालू केले. तिने त्या स्वभावदोषावर स्वयंसूचना घेतल्या आणि ती त्या साधिकेमध्ये परात्पर गुरु डॉक्टर अन् श्रीकृष्ण यांना पाहू लागली. त्यामधून ती बाहेर पडली, तेव्हा तिचा कृतज्ञताभाव जागृत झाला होता. तिच्या डोळ्यांतून बराच वेळ भावाश्रू वहात होते. तिला संतांच्या भेटीविना कधीच भावाश्रू आलेले मी पाहिले नव्हते. यावरून ‘तिने किती मनापासूून प्रयत्न केले असतील ?’, हे माझ्या लक्षात आले.

५. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा अनमोल सहवास !

५ अ. सोलापूर सेवाकेंद्रात जात्यावर दळायला शिकणे आणि सद्गुरु (कु. ) स्वाती खाडये यांच्या समवेत दळतांना पुष्कळ भावस्थिती अनुभवणे : आम्हाला काही दिवस सोलापूर सेवाकेंद्रात रहाण्याची संधी मिळाली. तेव्हा तिने तेथील सर्व साधकांना आपलेसे करून घेतले. सानिकाने काही दिवसांतच सद्गुरु स्वातीताईंचेही (सद्गुरु (कु.) स्वाती खाडे यांचेही) मन जिंकले. तिथे तिने जात्यावर दळायला शिकून घेतले. तिने सद्गुरु स्वातीताईंच्या समवेत इडलीसाठी तांदूळ दळले. तेव्हा तिला फार आनंद झाला. जणू ‘जनाबाईसमवेत श्रीकृष्ण दळण दळत आहे’, असे जाणवून तिची पुष्कळ भावजागृती झाली.

६. आवड-निवड नसणे

तिला कपडे आणि खाणेपिणे यांत अधिक आवड-निवड नाही. मी तिच्यासाठी जे कपडे निवडते, तेच ती घालते.

७. इतरांना साहाय्य करणे

कुणाला साहाय्याची आवश्यकता असल्यास स्वतःचा कसलाच विचार न करता ती तत्परतेने साहाय्य करते.

८. सानिकाला तिचे स्वभावदोष आणि अहं सांगितल्यानंतर आत्मचिंतन करून ती ते न्यून करण्यासाठी प्रयत्न करते.

९. स्वभावदोष : मनाने करणे, स्वतःच्या मतावर ठाम असणे आणि अती आत्मविश्‍वास’

– सौ. स्वाती सुनील सोनीकर (आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.३.२०२१)

सद्गुरु स्वातीताईंनी केलेले कौतुक !

(सद्गुरु) कु. स्वाती खाडये

१. सानिकाने काढलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र सद्गुरु स्वातीताईंना दाखवल्यानंतर त्या ‘अप्रतिम’, असे म्हणाल्या. तेव्हा ‘साक्षात् भवानीमाताच आशीर्वाद देत आहे’, असे मला वाटले.

२. सोलापूर येथून निघतांना सद्गुरु (कु.) स्वातीताई म्हणाल्या, ‘‘सानिकाने पुष्कळ जीव लावला आहे. तिची आध्यात्मिक प्रगती होत आहे.’’ हे वाक्य ऐकल्यानंतर माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि तिच्या साधनेच्या संदर्भातील माझी काळजी दूर झाली.

– सौ. स्वाती सुनील सोनीकर (आई)

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया करून स्वतःमध्ये पालट करणारी कु. सानिका !

 १. चिकाटी असणे

‘कु. सानिकाला एखादी गोष्ट शिकायची असल्यास त्यासाठी ती चिकाटीने प्रयत्न करते. लहानपणापासून तिला चित्रकलेची पुष्कळ आवड आहे. ती चित्रे काढण्याचा प्रयत्न करायची; पण तिला तितकेसे चांगले चित्र काढता यायचे नाही, तरी चिकाटी न सोडता ती प्रयत्न करत राहिली. आता ती सराव करून पुष्कळ सुंदर चित्र काढायला शिकली. ती आता देवतांची सुंदर चित्रे काढते.

कु. सानिका हिने रेखाटलेले श्री लक्ष्मीमातेचे चित्र

२. अध्यात्माची ओढ असणे

तिला लहानपणापासून कधी कधी शाळेत आणि नातेवाईकांकडे जायला आवडायचे नाही. त्यासाठी ती पुष्कळ त्रास द्यायची. आम्ही साधना करण्यासाठी आश्रमात रहायला आल्यावर ती स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करत होती. तेव्हा तिचा पुष्कळ संघर्ष व्हायचा, तरीही तिने कधी घरी जाण्याचा आग्रह केला नाही. ‘पूर्णवेळ साधनाच करायची आहे’, या निर्णयावर ती ठाम आहे.

३. कु. सानिकामध्ये जाणवलेले पालट  !

३ अ. ऐकण्याची वृत्ती वाढणे : सानिका लहान असतांना मी तिला सांभाळायचे. तेव्हा ती माझे ऐकायची नाही आणि न विचारता मनाने कृती करायची; परंतु आता आश्रमात येऊन स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया केल्यानंतर तिची ऐकण्याची वृत्ती वाढली आहे. आता आई-बाबा नसतांनाही ती मी सांगितलेले ऐकते आणि विचारून कृती करते.

३ आ. मनामध्ये विकल्प न ठेवणे : कधी आम्हा दोघींमध्ये काही प्रसंग झाला, तर ती ते मनात न ठेवता लगेच माझ्याशी बोलते.’

– कु. स्नेहल सुनील सोनीकर (बहीण), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.३.२०२१)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक