अतिरेकी प्रेम !
कोल्हापूर येथील एका तरुणाने त्याच्या प्रेयसीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर काही किलोमीटरपर्यंत ऑईल पेंटने ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे लिहिले. कोल्हापूर जिल्हा तसे काहीतरी वेगळे करण्यासाठी प्रसिद्ध आहे; मात्र या तरुणाच्या कृत्यामुळे परिसीमा झाली ! एकमेकांवर प्रेम व्यक्त करणे, हे काही चुकीचे नाही; मात्र ते खासगीत करण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी त्याचे अशा प्रकारे प्रदर्शन मांडणे, हे चुकीचे आहे. यातून नेमका कोणता संदेश समाजाला जाणार ? ही एक प्रकारची विकृतीच समाजात दिसते. नाही म्हणायला याविषयी अतीउत्साही लोक ‘शहाजहांनने नाही का त्याच्या पत्नीसाठी ताजमहाल बांधला’, असे सांगू शकतील. ताजमहाल हे ‘तेजोमहालय’ म्हणजेच शिवमंदिर असल्याचे ढीगभर पुरावे इतिहासतज्ञ कै. पु.ना. ओक यांनी दिले आहेत. त्यामुळे ‘ताजमहाल प्रेमाचे प्रतिक आहे’, या म्हणण्याला काहीच अर्थ नाही.
दुसरे उदाहरण पुणे येथील. तेथे अनुमाने ४-५ वर्षांपूर्वी ‘शिवदे, मला माफ कर !’, असे फलक मोठ्या संख्येत पुणे शहर परिसरात लावले होते. त्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र काही हाती लागले नाही, म्हणजे कुणीही येऊन (विकृत) प्रेमाचे बाजारीकरण करतो आणि पोलीस-प्रशासन यांना काही समजत नाही, हे सगळे हास्यास्पद नाही का ? एवढे फलक लावेपर्यंत कुणालाच ते लक्षात आले नाही का ? यातून शहरांमध्ये कुणीही येऊन काहीही करू शकतो, असे लक्षात येते.
जगावेगळी कृती करून दाखवली म्हणजे ‘माझ्या मनात एखाद्याचे केवढे मोठेे स्थान आहे’, असे आजकालच्या तरुण-तरुणींना वाटते. भारतीय संस्कृतीत व्यक्तीगत प्रेमापेक्षा धर्म आणि राष्ट्र यांवरील प्रेम अधिकाधिक व्यापकता दर्शवते. राजाचे प्रजेवर पितृवत् प्रेम असेल, तर प्रजेला कसलीच उणीव भासत नाही. एखाद्या आस्थापनाच्या मालकाचे त्याचे कामगार आणि अधिकारी यांच्यावर प्रेम असेल, तर तोही मुलांप्रमाणे आस्थापनाशी संबंधित सर्व कर्मचार्यांची काळजी घेतो. कोरोनामुळे झालेल्या दळणवळण बंदीच्या वेळी टाटा यांनी त्यांच्या आस्थापन समूहातील सर्व कर्मचार्यांना अनेक मास काम बंद असूनही पूर्ण वेतन दिले होते आणि अन्य आस्थापनांच्या मालकांनाही तसा उपदेशही केला होता. असे प्रेम व्यक्त केल्यास कुटुंब आणि समाज या सर्वांचेच भले होईल, हे निश्चित !
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल