‘धर्मसंवाद’ या ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या संहिता लेखनाच्या सेवेतून श्री. आनंद जाखोटिया यांना शिकायला मिळालेली सूत्रे
३.४.२०२१ या दिवशी ‘ऑनलाईन धर्मसंवाद’ला एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने….
‘श्री गुरुकृपेने गेल्या एक वर्षापासून ‘धर्मसंवाद’ या ऑनलाईन सत्संगाच्या संहिता लिखाणाची सेवा श्री गुरु माझ्याकडून करून घेत आहेत. आज या सत्संगाच्या वर्षपूर्तीला मागे वळून पाहिल्यावर जाणवते की, श्री गुरूंनी वेळोवेळी शिकवलेल्या सेवेमुळे ही समष्टी सेवा मला करता आली. या सत्संग संहितेच्या संकलनातून परात्पर गुरु डॉक्टर साधक आणि संत यांच्या माध्यमातून मला सतत घडवत आहेत. ‘विविध विषयांचा अभ्यास, त्याविषयी संतांचा आध्यात्मिक दृष्टीकोन आणि विषयांच्या सादरीकरणाचा अभ्यास, अशा अनेक गोष्टी या काळात मला शिकायला मिळाल्या. त्याविषयी आलेले अनुभव कृतज्ञता स्वरूपात श्री गुरूंच्या चरणी अर्पण करत आहे.
१. श्री गुरूंनी दूरदृष्टीने शिकवलेली संकलन सेवा
१ अ. काही वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांनी अनेक वर्षांपासून एकत्र करून ठेवलेली कात्रणे देऊन ‘त्यातील लिखाण कसे निवडायचे ?’, हे शिकवणे : काही वर्षांपूर्वी मी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संपादकीय विभागात सेवा करत असतांना मला एका सेवेच्या निमित्ताने परात्पर गुरु डॉक्टरांकडे जायला मिळाले. त्या वेळी त्यांनी अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या विषयांवर जमा केलेल्या वृत्तपत्रीय कात्रणांची धारिका (फाईल) दाखवली. ही सर्व कात्रणे विषयांनुसार वेगवेगळ्या धारिकेमध्ये होती. त्यांनी एक धारिका काढून ‘त्यातील लिखाण कसे निवडायचे ? खुणा कशा करायच्या ?’, हे सर्व शिकवले. अशा प्रकारची सेवा मी पहिल्यांदा करत होतो. गुरुमाऊलींनी ही सेवा माझ्याकडून करवून घेतली. नंतर त्यांना मी निवड केलेले लिखाण दाखवल्यावर त्यांनी ‘योग्य केले आहेस ! ही सेवा तू करू शकतोस’, असे सांगितले आणि त्यांच्याकडील विविध विषयांची कात्रणे असलेला एक खोका आमच्याकडे सुपूर्द केला.
१ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे एकेका विषयावर लेख लिहितांना श्री. चेतन राजहंस यांचे साहाय्य लाभणे आणि लेख संकलन ही दीर्घकालीन सेवा शिकवतांना चेतनदादांनी मनाचेही संकलन करण्यास शिकवणे : त्यानंतर काही मासांनी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘कात्रणांवर ज्या खुणा केल्या आहेत, ते लिखाण टंकलिखित करून एकेक विषयावर लेख सिद्ध करा. त्या लेखामध्ये ‘हिंदु राष्ट्रात कशी व्यवस्था असेल ?’, हेही लिहा.’’ मला दैनिकातील वार्तांच्या व्यतिरिक्त अन्य संकलनाचा गंध नव्हता. त्या वेळी मला श्री. चेतन राजहंस यांचे साहाय्य लाभले. दादांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्या लेखांच्या संकलनाची सेवा चालू केली. चेतनदादांनी संकलनातील अनेक बारकावे शिकवले. ‘सर्व कात्रणे टंकलिखित करायची, त्यांचा क्रम ठरवायचा, त्याला योग्य मथळे द्यायचे, दृष्टीकोन देऊन त्याला प्रस्तावना लिहायची’, असे या सेवेचे स्वरूप होते. लेखांचे संकलन ही दीर्घकालीन सेवा होती. ही सेवा मी करत होतो; पण माझ्या मनाला ती कठीण वाटत होते. ‘सर्व काही लवकर पूर्ण झाले पाहिजे’, या विचारामुळे तो लेख परिपूर्ण होईपर्यंत त्याला वारंवार हाताळणे, हे माझ्या प्रकृतीच्या विरोधात होते. गुरुकृपेने आणि चेतनदादांनी वारंवार सांगून त्या लेखासमवेत मनाचे संकलन करण्यासही शिकवले. त्यामुळे माझा उत्साह आणि ही सेवा करण्याची प्रेरणाही सतत टिकून राहिली.
१ इ. काही वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांनी सूत्रसंचालनाच्या पहिल्या संहितेतील भाषांतर आणि संकलन यांच्या अनेक चुका दाखवून सेवा परिपूर्ण करण्याचे महत्त्व लक्षात आणून देणे : त्या वेळी ‘संकलन एक विद्या आहे आणि ती आत्मसात केली पाहिजे’, असा माझा दृष्टीकोन नव्हता. ‘ही सेवा मिळाली आहे आणि ती आपल्याला करायची आहे’, हाच विचार माझ्या मनात होता. कळत नकळत ही विद्या श्री गुरूंनी मला शिकवली. आज त्याचा उलगडा होत आहे. ही सेवा शिकल्यामुळे नंतरच्या काळात भाषणांच्या संहिता, सूत्रसंचालन संहिता बनवणे आदी सेवा मला मिळाल्या. काही वर्षांपूर्वी मी केलेल्या सूत्रसंचालनाच्या संहितेत भाषांतर आणि संकलन यांच्या अनेक चुका दाखवून गुरुदेवांनी माझ्यातील ‘निष्काळजीपणा’ हा स्वभावदोष लक्षात आणून दिला. ते म्हणाले, ‘‘आपण जे करतो, ते परिपूर्ण असावे. केंद्रापर्यंतचे साधक त्याचा वापर करतांना त्याची गुणवत्ता न्यून होऊ शकते. आपण लिखाण देतांनाच ते परिपूर्ण दिले नाही, तर शेवटपर्यंत त्यात किती त्रुटी रहातील, याचा आपण विचारही करू शकत नाही. त्यामुळे आपण सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’’
परात्पर गुरु डॉक्टरांनी या सेवेसाठी आधीच घडवल्याने मला ‘धर्मसंवाद’ या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाची संहिता बनवण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.
२. श्री गुरुकृपेने चालू झालेला ‘धर्मसंवाद’ हा ‘ऑनलाईन’ सत्संग
२ अ. ज्ञानशक्तीचा अमूल्य ठेवा असलेल्या सनातनच्या ग्रंथसंपदेमुळेच ‘धर्मसंवाद’ सत्संगाच्या माध्यमातून धर्मप्रसार करणे शक्य ! : परात्पर गुरुदेवांनी संकलित केलेल्या ग्रंथसंपदेमुळेच गेले वर्षभर वेगवेगळ्या विषयांवर धर्मसंवादाचे कार्यक्रम करता आले. गुरुदेव नेहमी म्हणतात, ‘‘हिंदु धर्माचे कार्य ज्ञानशक्तीचे आहे. त्यामुळे आपण ज्ञानशक्तीच्या आधारे कार्य केले पाहिजे.’’ ज्ञानशक्तीचा अमूल्य ठेवा जो त्यांनी ग्रंथांच्या माध्यमातून दिला आहे, त्याच्या आधारावरच काळानुसार धर्मप्रसार करणे शक्य होत आहे. ‘धर्मसंवाद’ या कार्यक्रमामुळे हे ग्रंथ आता विषयानुसार संतांच्या वाणीतून प्रश्न-उत्तर स्वरूपात दृश्य रूपात उपलब्ध झाले आहेत. आज लोकांची वाचनाची आवड न्यून होत असतांना चलतचित्रांच्या माध्यमातून आणि प्रश्नोत्तर स्वरूपात हे कार्यक्रम होत असल्याने लोकांना याचा लाभ घेणे सहजसुलभ झाले आहे.
२ आ. धर्मसंवाद संहिता लिखाणाच्या सेवेतून पुन्हा संकलन सेवेला आरंभ होणे आणि लिखाण करतांना श्री. रमेश शिंदे यांच्याकडून विविध पैलू शिकायला मिळून आत्मविश्वासही वाढणे : गेल्या काही वर्षांपासून मी प्रसारातील सेवा करू लागल्यानंतर संकलनाच्या सेवेत माझा खंड पडला. धर्मसंवादाची संहिता बनवण्याची सेवा मिळाल्यावर ही सेवा पुन्हा चालू झाली. प्रतिदिन होणार्या या कार्यक्रमाचे प्रारंभी ८ – ९ पाने आणि आता कार्यक्रमाचा वेळ अल्प केल्याने प्रतिदिन ५ – ६ पाने संकलित करण्याची सेवा गुरुकृपेने वर्षभरापासून होत आहे.
मी बनवलेल्या संहिता श्री. रमेश शिंदे अंतिम वाचून त्यात सुधारणा सांगतात. संहिता लिखाण करतांना वेगवेगळ्या ठिकाणाहून संदर्भ घ्यावे लागतात. ‘ते संदर्भ कसे निवडायचे ? विविध विचारसरणीचे लिखाण ओळखून त्यातील धर्मशास्त्राला अनुकूल असे लिखाण कसे वापरायचे ? ऐतिहासिक नावे आणि ऐतिहासिक संदर्भ निश्चिती करूनच कसे वापरावेत ? धर्मशास्त्रातील प्रश्न निर्माण करणार्या काही गोष्टींचा वेगवेगळ्या ग्रंथांतून अभ्यास करून योग्य ते समाजापर्यंत पोचवण्याची तळमळ कशी असायला हवी ?’, अशी अनेक सूत्रे श्री. रमेश शिंदे यांच्याकडून मला शिकायला मिळाली. त्यामुळे विविध पैलू शिकायला मिळून सेवेविषयीचा माझा आत्मविश्वासही वाढत आहे.
३. सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांचे धर्मसंवाद संहिता लिखाणाच्या सेवेत लाभलेले मार्गदर्शन !
समाजासाठी जरी ‘धर्मसंवाद’ हा ज्ञानसंवर्धन करणारा कार्यक्रम असला, तरी गुरूंसाठी ‘सेवेच्या माध्यमातून साधक घडणे’, हे अधिक महत्त्वाचे असते. सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांनी या सेवेविषयी वेळोवेळी मार्गदर्शन करून मला घडवले.
३ अ. दिनविशेष पहायला शिकवणे आणि त्यानुसार धर्मसंवादाचे विषय निश्चित केले जाऊ लागणे : प्रारंभी धर्मसंवादासाठी एक विषय घेतला की, त्याचे पुढचे पुढचे भाग चालू असायचे. प्रासंगिक मोठे सण-उत्सव सोडले, तर अन्य दिनविशेषांचा विचार आम्ही कधी केला नव्हता. ‘लाईव्ह’ कार्यक्रमांच्या दृष्टीने दिनविशेषसारख्या प्रासंगिक विषयांचा विचारही व्हायला हवा’, हे सद्गुरु पिंगळेकाकांनी लक्षात आणून दिले. त्यानंतर मासातील सर्व दिनविशेषांचा अभ्यास करून त्यानुसार धर्मसंवादाचे विषय निश्चित केले जाऊ लागले. त्या निमित्ताने ‘क्रांतिकारकांचे दिवस, संतांचे कार्य आणि विचार’, अशा विविध दिनविशेषांचा आमचा अभ्यास झाला आणि त्या त्या दिनविशेषांच्या संदर्भातील लोकही कार्यक्रमासाठी जोडले जाऊ लागले.
३ आ. संकलनातील चुकांप्रती गांभीर्य निर्माण करणे : संहिता झाल्यावर सद्गुरु पिंगळेकाका वेळोवेळी त्यातील काही त्रुटी दाखवून द्यायचे. ‘काळानुसार कोणता दृष्टीकोन समाजात जायला हवा आणि कोणता नको ?’, हेही त्यांनी माझ्या लक्षात आणून दिले. संकलनाच्या चुकांप्रती गांभीर्य वाढवण्यासाठी त्यांनी मला साहाय्य केले.
३ इ. विषयाच्या सादरीकरणाचा अभ्यास करायला शिकवणे : ‘संहिता लेखन करतांना विषयाच्या सादरीकरणाचाही विचार करायला हवा. एखादा विषय थेट न मांडता, त्याची पार्श्वभूमी सिद्ध करून आजच्या उदाहरणांसहित तो समाजासमोर ठेवला, तर त्यांना विषयाचे आकलन होऊ शकते. त्यामुळे त्यांना विषय ग्रहण होऊ शकतो’, हे सद्गुरु पिंगळेकाका यांनी लक्षात आणून दिले.
३ ई. कार्यक्रमाच्या प्रसाराची दिशा देणे : ही सेवा करतांना ‘धर्मसंवाद’ कार्यक्रमाच्या संहिता संकलनापर्यंतच माझा विचार होता. ‘सणांच्या, दिनविशेषाच्या एक दिवस आधी त्याविषयीचा कार्यक्रम प्रसारित केला, तर समाजातील लोकांना प्रत्यक्ष कृती करता येईल’, असे अनेक बारकावे त्यांनी माझ्या लक्षात आणून दिले.
३ उ. सेवेचा समष्टी सेवेसाठी लाभ करून घेण्यास शिकवणे : एकदा सद्गुरु पिंगळेकाका म्हणाले, ‘‘खूप निवडक साधकांना विविध विषयांवरील हा अभ्यास करण्याची संधी मिळते. समष्टी सेवेसाठी देवाने ही संधी दिली आहे. त्यामुळे संहिता लिखाणासोबत त्यातील विषयांकडेही अभ्यासाच्या दृष्टीने पहायला हवे.’’ त्यांनी हे लक्षात आणून दिल्यावर या सेवेविषयी आणखी कृतज्ञता वाढली. त्यामुळे संकलनासह आता तो विषय ग्रहण करण्याचा प्रयत्नही करत आहे.
‘ज्ञान गुरूंकडून ग्रहण केले पाहिजे’, असे शास्त्र सांगते. ‘मनाच्या सर्व अडथळ्यांवर मात करून श्री गुरूंना अपेक्षित अशी सेवा त्यांच्या कृपेविना होऊ शकत नाही आणि गुरूंविना आपण परिपूर्ण सेवा करूच शकत नाही’, हे यातून लक्षात आले. अजूनही गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करण्यास खूपच अल्प पडत आहे. त्यांना अपेक्षित असा सेवेचा ध्यास मला लागून त्यांच्या चरणी खर्या अर्थाने कृतज्ञतापुष्प अर्पण करता येऊ दे, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !’
– श्री. आनंद जाखोटिया, देहली (३१.३.२०२१)
काळाची पावले ओळखून ‘ऑनलाईन’ सेवेविषयी साधकांना स्वयंपूर्ण बनवणारे द्रष्टे गुरु परात्पर गुरु डॉक्टर आठवले !‘परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना प्रत्येक सेवा करायला शिकवली आहे. चित्रीकरण करणेे, वृत्ते बनवणे, छायाचित्रे काढणे, संकलन करणे, अशा कित्येक सेवा गुरुदेवांनी शिकवलेल्या बारकाव्यांनुसार साधक अव्याहत करत आहेत. दळणवळण बंदीच्या काळात गुरुदेवांची दूरदृष्टी पुन्हा एकदा शिकायला मिळाली. त्यांनी साधकांना अशा प्रकारे घडवल्यामुळे ४ ‘ऑनलाईन’ कार्यक्रमांचे सादरीकरण सातत्याने करता येत आहे. त्यात संहिता बनवणे, ध्वनीमुद्रण करणे, सूत्रसंचालन करणे, प्रसारण (‘टेलिकास्ट’) करणे आदी गोष्टींसाठी जर समाजातील लोकांवर कुणी विसंबून असेल, तर कोरोनाच्या काळात हे सर्व करण्याला पुष्कळ मर्यादा आल्या असत्या. या सर्व सेवा साधकांनाच करता येत असल्याने कोरोनाच्या काळातही हे सर्व करता आले. आपल्या ऑनलाईन कार्यक्रमाविषयी जयपूर येथील एक पत्रकार श्री. निधीश गोयल म्हणाले, ‘‘प्रतिदिन अशा प्रकारचे कार्यक्रम करणे कठीण आहे. तुमच्या कार्यक्रमांचा मी अभ्यास करतो. तुम्ही संस्थेचे नाव आणि लोगो लावला नाही, तरी कार्यक्रम पाहून मी सांगू शकतो की, हा सनातन संस्था किंवा हिंदु जनजागृती समिती यांचा कार्यक्रम आहे. तुम्ही सादरीकरणाचीही एक गुणवत्ता राखली आहे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.’’ गुरुसेवक, – श्री. आनंद जाखोटिया, देहली (३१.३.२०२१) |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |