राज्य सरकार कोविड अल्प करण्यात नाही, तर लोकांना त्रास देण्यात गुंतलेले ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

नागपूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या भाषणात कोव्हिड का वाढत आहे ? तो आपल्या महाराष्ट्रातच का वाढत आहे ? त्यावर आम्ही काय उपाययोजना करतो आहोत, हे सांगण्याची आवश्यकता होती; मात्र मुख्यमंत्र्यांनी ‘विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, जे त्यांना उपदेश देतात, त्यांना उत्तर दे’, यामध्येच संपूर्ण वेळ वाया घालवला आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २ एप्रिल या दिवशी येथे केली.

ते पुढे म्हणाले की, ‘फेसबूक’च्या थेट प्रेक्षपणातून मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केले. ते मला तरी समजलेले नाही; कारण त्यामध्ये कुठल्याही उपाययोजना नव्हत्या. कुठलेही निर्णय नव्हते. ‘तज्ञांशी बोलून २ दिवसानंतर सांगू’ , अशीच सूत्रे त्यांनी मांडली. मुख्यमंत्र्यांनी अनेक देशांची उदाहरण दिली. कोविडच्या काळात त्या देशांनी काय केले, हेही पाहिले पाहिजे; मात्र राज्य सरकार वीजतोडणी, तसेच लोकांना त्रास देण्यातच गुंतलेली आहे. ‘दळणवळण बंदी’ लागू केल्यास त्याकाळात काळात नागरिकांना कशा पद्धतीने साहाय्य केले जाईल, हे सांगणे आवश्यक होते; मात्र मुख्यमंत्र्यांच्या भाषणात ही सर्व सूत्रे कुठेच दिसून आली नाहीत.

फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे; कारण महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की, ज्याने कोरोना काळात दळणवळण बंदी केल्यानंतरही नागरिकांना कोणतेही साहाय्य केले नाही. केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य दिले होते; मात्र महाराष्ट्र राज्याने एक पैसाही नागरिकांना साहाय्यासाठी दिला नाही. पंतप्रधान मोदी यांनी देशात ‘दळणवळण बंदी’ घोषित केली, तेव्हा प्रत्येक घटकातील नागरिकांची काळजी घेतली होती. त्यांच्यासाठी काही ना काही उपाययोजना केल्या होत्या. प्रत्येक नागरिकांच्या घरी अन्नधान्य पोचेल अशी व्यवस्था केली होती. खात्यात पैसे जातील, असे नियोजन केले होते. राज्य सरकारने अर्थसाहाय्य न देता केवळ लोकांची वीज कापून लोकांना त्रास दिला आहे, असा आरोप त्यांनी केला.