पडेल येथील कोवीड कक्षात रुग्णांना चांगली वागणूक मिळत नसल्याचा भाजपचा आरोप
देवगड – कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना तालुक्यातील पडेल येथील कोवीड कक्षात चांगली वागणूक मिळत नाही. पडेल आरोग्यकेंद्रात कोवीड लसीकरणाचा वेगही अत्यंत अल्प आहे. त्यामुळे लस उपलब्ध असतांनाही प्राथमिक आरोग्य केंद्रातून लसीचा तुटवडा असल्याचे सांगितले जाते, असा आरोप भाजपच्या शिष्टमंडळाने पडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी पोतदार यांची भेट घेऊन केला.
तिर्लोट येथील एकाचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला. त्या रुग्णाला आणि त्यांच्या नातेवाइकांना येथील कोवीड कक्षात चांगली वागणूक मिळत नाही. नागरिक कोरोनाच्या नियमांविषयी अनभिज्ञ असतात. अशा वेळी त्यांच्याशी सौजन्याने वागणे आणि त्यांना आवश्यक असलेली माहिती देणे आवश्यक आहे. केंद्राच्या स्थितीत सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याची चेतावणी भाजपच्या शिष्टमंडळाने डॉ. पोतदार यांना दिली.
या वेळी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य गणेश राणे, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली आदी उपस्थित होते.