आदित्य डायग्नोस्टिक’कडून कचरा कुंडीत ‘पीपीई किट’ टाकण्याचा प्रकार; महापौरांकडून १ लाख रुपयांचा दंड
सांगली, ३ एप्रिल – गणेशनगरजवळ असलेल्या पोहण्याच्या तलावाजवळ असलेल्या महापालिकेच्या कचराकुंडीत ‘आदित्य डायग्नोस्टिक’कडून ‘पीपीई किट’ आणि वैद्यकीय कचरा टाकण्याचा प्रकार नागरिकांनी उघडकीस आणला. सदरची घटना सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना समजताच त्यांनी तात्काळ धाव घेत ‘आदित्य डायग्नोस्टिक’ला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी ‘आदित्य डायग्नोस्टिक’चा परवाना रहित करण्याविषयी चर्चा करू, असे या वेळी महापौरांनी सांगितले.
या संदर्भात आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, ‘‘रुग्णालयातील वैद्यकीय कचरा ‘सूर्या एजन्सी’कडे द्यावा, असे असतांना ‘आदित्य डायग्नोस्टिक’कडून तो महापालिकेच्या कचराकुंडीत टाकण्याचा प्रकार झाला हे गंभीर आहे. या संदर्भात ‘आदित्य डायग्नोस्टिक’ला नोटीस बजावण्यात येणार आहे.’’