पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मृत्यूच्या संदर्भात केलेले अनमोल मार्गदर्शन !
१. जशी झोप सहज येते, तशीच काळझोप, म्हणजे मृत्यूही सहज येतो !
‘मनुष्य प्रतिदिन झोपतो, तेव्हा तो मरतच असतो. झोप नेमकी केव्हा आणि किती वाजता आली, हे मनुष्य सांगू शकत नाही. झोप अगदी सहज येते. तशीच काळझोप, म्हणजे मृत्यू सहज येतो; मात्र देवाने प्रतिदिन प्राण्यांना मरण दाखवले आहे.’
२. जन्म, मृत्यू आणि देव
२ अ. जन्म आणि मृत्यू हा देवाचा खेळ असणे : ‘प्रत्येक माणसाच्या छातीमध्ये देवाने घड्याळ बसवले आहे. घड्याळात ठोके पडतात. हे ठोके बंद झाले की, जीवन संपले.’
२ आ. देवांचे जन्म-मृत्यूचे गणित : ‘मी आता सुख, दुःख आणि विकार यांच्या पलीकडे गेलो आहे. मी मन आणि माया जिंकली आहे. ही माझ्यावर पांडुरंगाची कृपा आहे. भगवंताने बनवलेली ८४ लाख योनींची शरिरे मला दिसली. मी त्यांचे जन्म-मृत्यू पाहिले; परंतु मला त्यांच्या शरिरातील जीवात्मे दिसले नाहीत. ‘ते जन्माला कुठून येतात ? आणि मृत्यूच्या वेळी कुठे उडून जातात ?’, हे देव दाखवत नाही. देवाचे हे गणित माणसाच्या बुद्धीच्या पलीकडील आहे. ते माणसाला सोडवताच येणार नाही.’
२ इ. देवाचे मृत्यूचक्र : माणूस मेला की, बारावे आणि तेरावे करतात. अरे, गेलेला कधीही परत आलेला कुणी पाहिला आहे का ? कारण जो मेला, तो कायमचा गेला. त्याला आपण कधीही पुन्हा पहाणार नाही. हे देवाचे मृत्यूचक्र आहे. सर्व जिवांच्या मागे ते फिरत आहे. कुठले जीव कुठे अदली-बदली करतो. ते त्याचे त्यालाच ठाऊक ! ’
३. मृत्यूच्या भीतीने वैद्यांचा धंदा जोरात असणे
जो प्राणी जन्माला यायचा आहे, त्याच्यासाठी देवाने वाट ठेवलेली आहे. त्या वाटेने तो येणारच आहे; परंतु सध्या समाज घाबरला आहे. त्याला मृत्यूची भीती वाटते. मेलो तर ? त्याचा लाभ सध्याचे वैद्य उठवत आहेत. सर्व धंद्यात वैद्यकीय धंदा सध्या तेजीत चालला आहे. देवाने सर्दी, ताप आणि मृत्यू ठेवला आहे; परंतु सगळे लोक मेले नाहीत.’
४. मृत्यूच्या संदर्भात अटळ सत्य
४ अ. जन्माला आलेल्या प्रत्येक जिवाला मृत्यू आहे ! : ‘जे या पृथ्वीतलावर आले, ते एक ना एक दिवस ‘राम राम’ करणारच आहेत. आलेला कुणीही येथेच रहाणार नाही. सर्वच मृत्यूच्या तोंडात जाणार आहेत. त्यांना काळ खाणार आहे; म्हणून माणसा, ‘माझे – तुझे’ करू नकोस. जे इथे आहे, ते देवाचे आहे. आपले काहीही नाही.’
४ आ. एकदा देवाचे बोलावणे आले की, जावेच लागेल ! : ‘माझे हे करायचे होते. माझे हे राहिले, ते राहिले, एवढे झाले असते, तर बरे झाले असते’, असे सांगून चालत नाही. देवाने बोलावले की, जावेच लागेल.’
४ इ. जो जन्माला येतो, त्याला मृत्यू येतच असणे आणि मनुष्य मृत झाला की, त्याचा देह नष्ट करावाच लागत असणे : ‘माणसाच्या देहातील आत्माराम गेला, शरिरातील पंचमहाभूते निघून गेली की, त्या शरिराला ‘मढे’ म्हणतात. कुणी मृत झाला की, ‘त्याला लवकर उचला, नाही तर थोड्या वेळाने त्याचा वास सहन होणार नाही’, असे म्हणतात. माणसाच्या आत पुष्कळ घाण आहे. विटाळाचा बनलेला हा देह मेल्यावर स्मशानभूमीमध्ये न्यावाच लागतो आणि नष्ट करावाच लागतो. मग तो गोरा असो कि काळा, राजा असो कि राणी असो ! सगळे जेवढे धरतीवर जन्माला आले, त्यांचे शेवटचे ठिकाण स्मशानभूमी !’
४ ई. भूतनाथ : भूतनाथ सर्व जगाचे भस्म करतो; म्हणून शंकराचे भक्त कपाळाला भस्म लावतात. एखाद्याने भस्म लावले आणि त्याची वेळ आली की, शंकर त्याचेसुद्धा भस्म करतो.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– पूज्य (ह.भ.प.) सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.
(पू. सखाराम बांद्रे महाराज यांचे हे लिखाण २००५ ते २०२० या कालावधीतील आहे.)