विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक
राज्यात पुन्हा दळणवळण बंदी लागू करण्याचे संकेत
मुंबई – राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता राज्यात पुन्हा दळणवळण बंदी लागू करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. याविषयी निर्णय घेण्यासाठी ३ एप्रिल या दिवशी उद्धव ठाकरे यांनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. ही बैठक ‘ऑनलाईन’ झाली. सद्यस्थिती पहाता शासनाला कठोर निर्णय घ्यावा लागला, तर सहकार्य करण्याचे आवाहन या वेळी उद्धव ठाकरे यांनी बैठकीतील उपस्थित मान्यवरांना केले. या बैठकीत पत्रकार, व्यायामशाळांचे संचालक, उद्योजक, मल्टीप्लेक्सचे मालक आदी क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी चर्चा करून मुख्यमंत्री दळणवळण बंदीविषयीचा निर्णय घोषित करणार आहेत.
२ एप्रिल या दिवशी उद्धव ठाकरे यांनी जनतेशी ‘ऑनलाईन’ साधलेल्या संवादामध्ये राज्यात दळणवळण बंदी लागू करण्याविषयी येत्या २ दिवसांमध्ये मान्यवरांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली.