इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देणार !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

( प्रतिकात्मक चित्र )

मुंबई – विनामूल्य शिक्षण अधिकार कायद्याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या अभ्यासक्रमाचे मूल्यमापन केले पाहिजे; परंतु कोरोनाच्या स्थितीमुळे या वर्षी असे करणे शक्य नाही. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून शिक्षण हक्क अधिकाराच्या अंतर्गत इयत्ता १ ली ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ३ एप्रिल या दिवशी केली. वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर याविषयीची माहिती देणारा व्हिडिओ प्रसारित केला आहे.

यामध्ये वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे की, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मधल्या काळात आपण ‘ऑनलाईन’ आणि ‘ऑफलाईन’ आदींच्या माध्यमातून शिक्षण चालू ठेवले. इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या शाळा आपण या वर्षात चालू करू शकलो नाही. इयत्ता ५ ते ८ वी पर्यंतच्या शाळा आपण चालू केल्या; परंतु काही ठिकाणी शाळा चालू होऊ शकल्या नाहीत. ज्या ठिकाणी शाळा चालू झाल्या, त्या ठिकाणीही अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. मुलांपर्यंत विविध माध्यमांतून शिक्षण पोचवण्याचे आणि त्यांची शैक्षणिक हानी होणार नाही, यासाठी आम्ही आम्ही सातत्यापूर्ण प्रयत्न करत आहोत.