संगीतातील विविध रागांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांवर होणारा परिणाम
नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
संगीत आणि नृत्य यांवरील प्रयोगांच्या सूक्ष्माच्या संदर्भातील वार्ता (सूक्ष्म-वार्ता) !
या जगामध्ये काही गोष्टी डोळ्यांनी दिसतात, तर काही दिसत नाहीत. ‘ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसत नाहीत, त्या अस्तित्वात नसतात’, असा अर्थ होत नाही, उदा. वारा डोळ्यांना दिसत नाही, म्हणजे ‘तो नाही’, असे नाही. साधनेमुळे जिवाची सात्विकता वाढू लागते. साधना जसजशी वृद्धींगत होत जाते, तसतशी स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील ‘सूक्ष्मातील’ कळू लागते आणि एखाद्या गोष्टीतील चांगली अन् त्रासदायक स्पंदने जाणवू लागतात. सध्या समाज सात्विकतेपासून दूर चालला आहे आणि रज-तमात्मक चालीरिती समाजात दृढ होत आहेत. संगीत आणि नृत्य हे क्षेत्रही याला अपवाद नाही. हे समाजाला दाखवून देण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आम्ही संगीत आणि नृत्य यांवर संशोधनात्मक प्रयोग केले. जे आम्हाला सूक्ष्मातून जाणवले, ते समाजाला सांगण्यासाठी आणि ‘योग्य काय असायला हवे ?’ ते त्याला समजण्यासाठी, ते वैज्ञानिक उपकरणांद्वारेही सिद्ध करून दाखवले आहे. येथे केवळ ‘अयोग्य गोष्टींचा कसा परिणाम होतो ?’, हे दाखवून देणार्या, म्हणजेच सूक्ष्माच्या संदर्भातील काही वार्ता (सूक्ष्म-वार्ता) देत आहोत.
२.१०.२०१७ या दिवशी संगीतातील विविध रागांचा आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तींवर होणार्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात प्रयोग करण्यात आले. या वेळी ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. प्रदीप चिटणीस यांनी विविध रागांचे गायन केले. त्या वेळी वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेले साधक ते राग ऐकायला उपस्थित होते. त्यांच्यावर या रागांचे प्रयोग करण्यात आले. तेव्हा लक्षात आलेल्या ठळक गोष्टी येथे देत आहोत.
१. राग : यमन
१ अ. साधकांना त्रास देणार्या वाईट शक्तींना राग-गायनातील चैतन्य सहन न होणे
१. यमन राग गायल्याने त्यातून वातावरणात प्रक्षेपित होणारे चैतन्य साधकांना तीव्र त्रास देणार्या वाईट शक्तींना सहन होत नव्हते, हे लक्षात येत होते.
२. आध्यात्मिक त्रास असलेल्या एका साधिकेचे डोके पुष्कळ दुखू लागले.
३. एका साधकाला तीव्र त्रास देणार्या वाईट शक्तीला या रागातील तानांचा (ताना म्हणजे एखाद्या रागाचे स्वर एका पाठोपाठ एक जलद लयीत म्हणणे किंवा त्या स्वरांचा आकार घेणे) अधिक प्रमाणात त्रास झाला.
१ आ. साधकांना आलेल्या चांगल्या अनुभूती
१. या प्रयोगात सहभागी झालेल्या वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधकांपैकी दोघांना विशुद्धचक्रापासून सहस्रारचक्रापर्यंत चांगल्या संवेदना जाणवल्या.
२. राग : मालकंस
२ अ. साधकांना आलेल्या चांगल्या अनुभूती
१. श्री. चिटणीस या रागातील स्वतः रचलेली बंदीश (राग-गायनात जे काव्य गातात, त्याला ‘बंदीश’ किंवा ‘चीज’ म्हणतात.) गात असतांना एका साधिकेला दैवी गंध आला.
२. दोन साधिकांना श्री. चिटणीस यांनी मालकंस राग गायला आरंभ केल्यापासून शेवटपर्यंत त्यांच्याभोवती पिवळसर पांढर्या रंगाची आभा दिसत होती.
३. श्री. चिटणीस हा राग गात असतांना एका साधकाला श्री गजानन महाराज यांचे अस्तित्व जाणवत होते. तेव्हा अन्य दोन साधकांनाही चांगले वाटले. (श्री. चिटणीस हे श्री गजानन महाराज यांचे असीम भक्त आहेत, हे त्या साधकाला ठाऊक नव्हते. – संकलक)
४. हा राग ऐकत असतांना वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या एका साधिकेला त्रास न्यून झाल्याचे जाणवत होते.
या वेळी श्री. चिटणीस यांनी ‘हा राग गात असतांना माझे ध्यान लागले होते’, असे सांगितले.
२ आ. साधकांना आलेल्या त्रासदायक अनुभूती
१. तीव्र त्रास असलेल्या एका साधिकेचे अंग पुष्कळ दुखू लागले.
२. या रागाची पहिली बंदीश ऐकत असतांना या प्रयोगात सहभागी झालेल्या वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधकांपैकी तिघांना झोप अनावर झाली. दुसरी बंदीश चालू झाल्यावर मात्र त्यांतील दोघांनी एकाच वेळी डोळे उघडले. (ही दुसरी बंदीश श्री. चिटणीस यांनी स्वतः रचलेली होती. – संकलक)
३. राग – पुरीया कल्याण (तराणा)
अ. या प्रयोगात सहभागी झालेल्या वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या सर्वच्या सर्व साधकांना चांगले वाटले. त्यांतील एका साधिकेला अनाहतचक्राच्या ठिकाणी चांगल्या संवेदना जाणवल्या.
४. निष्कर्ष
भारतीय शास्त्रीय संगीताचा परिणाम अभ्यासण्यासाठी आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांचे गायन ऐकण्यापूर्वी आणि गायन ऐकल्यावर ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस.)’ या उपकरणाच्या साहाय्याने सकारात्मक आणि नकारात्मक प्रभावळींचा अभ्यास करण्यात आला. त्यात शास्त्रीय संगीत ऐकल्यावर या साधकांची नकारात्मकता घटून सकारात्मकता वाढल्याचे प्रकर्षाने जाणवले.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
या प्रयोगांतून हे लक्षात येते की, भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये आध्यात्मिक स्तरावर अनुभूती देण्याचे सामर्थ्य आहे, तसेच त्यामध्ये नामजपादी उपाय करण्याचे, म्हणजे त्रास न्यून करण्याचेही सामर्थ्य आहे. अर्थात् हे परिणाम होणे गायकाची आध्यात्मिक पातळी आणि भाव इत्यादी घटकांवरही अवलंबून असते.’
– कु. तेजल पात्रीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.१०.२०१७)
|