भारताच्या ७ शेजारी देशांतील हिंदूंची स्थिती चिंताजनक !
सेंटर फॉर डेमोक्रेसी प्लुरलिझम अँड ह्यूमन राईट्सचा अहवाल !
भारतातील हिंदूंचीच स्थिती जेथे चांगली नाही, तेथे अन्य देशांतील हिंदूंची आणि तेही इस्लामी देशांतील हिंदूची स्थिती कधीतरी चांगली असू शकते का ? ही स्थिती पालटण्यासाठी सर्वप्रथम भारतातील हिंदूंची स्थिती चांगली करण्यासाठी येथे हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे. असे झाल्यावर अन्य देशांतील हिंदूंवर अत्याचार करण्याचे कुणीही दुःसाहस करणार नाही !
नवी देहली – सेंटर फॉर डेमोक्रेसी प्युरलिझम अँड ह्यूमन राईट्सने (सी.डी.पी. एच.आर्.ने) सादर केलेल्या मानवाधिकार अहवालात भारताच्या तिबेट, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया आणि श्रीलंका या देशांतील हिंदूंच्या एकूण परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. शिक्षणतज्ञ, अधिवक्ता, न्यायाधीश, पत्रकार आणि संशोधक यांच्या गटांनी या देशांतील नागरी समानता, त्यांची प्रतिष्ठा, न्याय आणि लोकशाही या आधारे हा अहवाल बनवला आहे.
१. या अहवालात पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्य, तसेच शिया आणि अहमदिया या अल्पसंख्यांकांचीही परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे म्हटले आहे. अहमदिया मुसलमानांनी ‘अजान’ हा शब्द वापरणेदेखील गुन्हा आहे. पाकमध्ये अल्पसंख्य असलेल्या हिंदू, शीख आणि ख्रिस्ती धर्माच्या तरुणींचे अपहरण, बलात्कार, बळजोरीने धर्मांतर अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. ‘पाकमधील अल्पसंख्यांकांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे’, असे सी.डी.पी. एच्.आर्.च्या अध्यक्षा प्रेरणा मल्होत्रा यांनी सांगितले.
२. बांगलादेशातील ढाका विद्यापिठाचे प्राध्यापक अबुल बरकत यांनी दिलेल्या अहवालानुसार गेल्या ४ दशकांत प्रतिवर्षी २ लाख ३० सहस्र ६१२ अल्पसंख्यांकांना ज्यात हिंदू सर्वार्धिक आहेत, अशांना देश सोडून पळून जागे लागत आहे. जर त्यांचे याच वेगाने स्थलांतर होत राहिले, तर २५ वर्षांनंतर एकही हिंदू तेथे रहाणार नाही. वर्ष १९७५ मध्ये घटना दुरुस्तीच्या माध्यमातून ‘सेक्युलरिझम’ हा शब्द काढून त्याऐवजही पवित्र कुराणातील ओळींचा समावेश करण्यात आला. वर्ष १९९८ मध्ये इस्लामला देशाचा धर्म घोषित करण्यात आले.
३. विविध निर्बंधांच्या माध्यमातून चीनने तिबेटमधील मानवाधिकारांची स्थिती लपवण्याचा प्रयत्न केला आहे. चीन तिबेटची सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि भाषिक ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे.
४. मलेशियामध्ये भूमीपुत्रांच्या बाजूने भेदभाव करणारा कायदा आहे. अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचेही यामुळे हनन होते.
५. या अहवालानुसार अफगाणिस्तानातील मानवाधिकार आणि अल्पसंख्यांकांविषयीचे भेदभावाचे धोरण यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या घटनेनुसार एखादी मुसलमान व्यक्तीच देशाची राष्ट्रपती आणि पंतप्रधान होऊ शकते. वर्ष १९७० च्या लोकसंख्येनुसार येथे ७ लाख हिंदू आणि शीख होते. आता केवळ २०० हिंदु आणि शीख कुटुंबे शिल्लक आहेत.
६. श्रीलंकेत २६ वर्षे चाललेल्या गृहयुद्धात १ लाख लोकांनी जीव गमावला आणि २० सहस्र तमिळ हिंदू बेपत्ता झाले, असे या अहवालात म्हटले आहे.
७. इंडोनेशियातही गेल्या काही वर्षांत धार्मिक कट्टरता आणि असहिष्णुता वाढली आहे. वर्ष २००२ च्या बाली येथे बॉम्बस्फोट घडवण्यामागे देशातील एका मोठ्या धार्मिक इस्लामी नेत्याचे नाव समोर आले होते. वर्ष २०१२ मध्ये हिंदूंवरील आक्रमणांसह अनेक घटना धार्मिक अल्पसंख्यांकांविरुद्ध पहायला मिळाल्या आहेत.