बेंबळी (जिल्हा धाराशिव) येथील पोलिसांनी केला ५० जप्त वाहनांचा परस्पर लिलाव !
लिलाव रहित करण्याची नागरिकांची मागणी
बेंबळी (जिल्हा धाराशिव) – येथील पोलीस ठाणे येथे जप्त करण्यात आलेल्या ५० हून अधिक वाहनांच्या लिलावाचे विज्ञापन प्रादेशिक वर्तमानपत्रात किंवा सार्वजनिक ठिकाणी न करता ३१ मार्च या दिवशी पोलिसांनी परस्पर लिलाव केला. त्यामुळे या लिलावात सहभागी होण्यापासून पुष्कळ लोक वंचित राहिले. पोलिसांनी सोयीस्कर नियमांचा वापर करून परस्पर लिलाव केल्याने हा लिलाव रहित करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बेंबळी पोलीस ठाण्याच्या परिसरातून मागील काही वर्षांत जप्त करण्यात आलेल्या अनुमाने ५० दुचाकी, ट्रॅक्टर, चारचाकी या वाहनांचा समावेश आहे. या लिलावाचे प्रगटन न केल्याने काही विशिष्ट लोकांना बोलावून लिलाव खासगी केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.