उंब्रज (जिल्हा सातारा) परिसरातील २ टोळ्यांवर सीमापारीची (तडीपारीची) कारवाई !

सातारा, २ एप्रिल (वार्ता.) – वेळोवेळी सुधारण्याची संधी देऊनही सुधारणा होत नसल्याने कराड तालुक्यातील उंब्रज परिसरातील २ टोळ्यांवर सीमापारीची कारवाई करण्यात आली आहे.

उंब्रज परिसरात मारामारी करणे, गर्दी करणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे, गंभीर दुखापत करणे, तसेच खुनाचा प्रयत्न करणार्‍या २ टोळ्या कार्यरत होत्या. पहिल्या टोळीतील विशाल दुटाळ, किरण पवार, अविनाश पवार, आशितोष संकपाळ, तर दुसर्‍या टोळीतील पवन साळुंखे, राजेंद्र मसुगडे आणि कैलास चव्हाण या दोन्ही टोळ्यांमधील ७ गुन्हेगारांवर जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी ही कारवाई केली आहे. जनतेमधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती.   उंब्रज पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सीमापार प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी संपूर्ण सातारा जिल्हा, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, शिराळा, वाळवा तालुक्यातून आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुका सीमेतून १ वर्षासाठी सीमापार केल्याचे आदेश दिले आहेत. बन्सल यांनी सातारा जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून १० प्रस्तावातील ४१ जणांचे सीमापारीचे आदेश दिले आहेत.