उन्हाळ्यात कृष्णा नदी कोरडी पडणार नाही, यासाठी महापालिका कोयना प्रशासनाशी समन्वय साधू ! – दिग्विजय सूर्यवंशी, महापौर
सांगली, २ एप्रिल – उन्हाळ्यात सांगलीच्या कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडणार नाही आणि सांगलीकर जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, यासाठी महापालिका प्रशासन कोयना प्रशासनाशी समन्वय साधणार आहे. या संदर्भात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या समवेत लवकरच बैठकीचे नियोजन केले जाईल, अशी माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी पत्रकारांना दिली.
महापौर पुढे म्हणाले, ‘‘प्रत्येक उन्हाळ्यात कृष्णा नदीतील पाणी पातळी अल्प झाल्याने सांगलीकरांना पाणीटंचाईचे संकट भेडसावते. पालकमंत्र्याच्या समवेतच्या बैठकीत कृष्णेची पातळी अल्प होताच तात्काळ कोयनेतून पाणी सोडण्याचे नियोजन केले जाणार आहे. तसेच वारणा धरणाविषयीही नियोजन केले जाणार आहे. यामुळे सांगली आणि मिरज शहराचा उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न निकालात निघणार आहे.’’