पुनःश्च व्हावे, हिंदवी स्वराज्य ! – शिवप्रेमींनी केली हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा
छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे विजयाचा पुरस्कार करा ! – मोहन शेटे
सहस्रो शिवप्रेमींच्या उपस्थितीत ‘ऑनलाईन’ शिवजयंती उत्सव पार पडला
पुणे, २ एप्रिल (वार्ता.) – स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा ध्यास असणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराजांनी दक्षिण दिग्विजय करायला गेल्यानंतर तिरुवण्णामलई येथील मुघल आक्रमकांनी तोडलेली मंदिरे पुन्हा उभी केली. छत्रपती शिवाजी महाराज केवळ राजकीय आक्रमकांविरोधातच नव्हे, तर सांस्कृतिक आणि धार्मिक आक्रमकांविरोधातही लढले. सर्व मावळ्यांच्या मागे महाराजांच्या युद्धनीतीची प्रेरणा होती. आजच्या कालानुरूप पालटलेल्या शस्त्रांसह महाराजांचे अनुकरण करायला हवे. हौतात्म्य नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे विजयाचा पुरस्कार करा. जो विद्वान आहे, जो ब्रह्मज्ञान जाणतो, सज्जन आहे, त्याचे रक्षण होणे आवश्यक आहे; म्हणूनच महाराजांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणतात. हिंदुत्व ही ब्राह्मणी कल्पना आहे, असे खोटे पसरवून हिंदु समाजात फूट पाडली जात आहे. संत तुकाराम महाराज भक्तीचे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे शक्तीचे प्रतीक आहेत. फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीयेला तुकाराम महाराजांचे स्मरण करणे आणि तृतीयेला छत्रपती शिवरायांचे स्मरण करणे, हा खरा भक्ती आणि शक्तीचा संगम होय, असे प्रतिपादन इतिहासप्रेमी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. मोहन शेटे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ मार्च या दिवशी तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमात सहस्रो शिवप्रेमींनी ‘पुनःश्च व्हावे, हिंदवी स्वराज्य !’, अशी प्रतिज्ञा हिंदु राष्ट्रासाठी केली. हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर या मान्यवर वक्त्यांनी जाज्ज्वल्य मार्गदर्शन केले. सहस्रो शिवप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी केले.
विशेष
१७ सहस्रांहून अधिक शिवप्रेमींनी या ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष नव्हे, तर हिंदु प्रशासक ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधिज्ञ परिषद
छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदु प्रशासक होते. त्यांना धर्मनिरपेक्ष राजा असल्याचे दाखवण्याचा कुटील प्रयत्न आज काही साम्यवादी करत आहेत. धर्मसभा, पंडितराव पदवी अशी अनेक राज्यकारभारातील उदाहरणे आहेत, ज्यातून महाराज धर्माला अनुसरून कृती करायचे हे स्पष्ट होते. महाराजांनी वतनदारी पद्धत बंद केली. किल्ल्यांच्या देखरेखीसाठी गावे नियोजित केली जायची. ही पद्धतही महाराजांनी काढून टाकली. लोकशाहीमध्ये लोकांना काय हक्क हवेत हे शोधायला लोक शिकले; मात्र महाराजांच्या राज्यात जनतेची कर्तव्ये काय आहेत हे शिकत मावळे लढले. स्वातंत्र्याच्या लढ्याचा आरंभ महाराष्ट्रातून झाला. आताही हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी महाराष्ट्रातील मावळ्यांनी संघटित होऊन प्रयत्न करायला हवेत.
हिंदु राष्ट्राची स्थापना हाच सर्व समस्यांवर उपाय ! – प्रशांत जुवेकर
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समस्यांवर हिंदवी स्वराज्य हाच उपाय असल्याचे जाणले होते. हिंदवी स्वराज्यात गोहत्याबंदी कायदा करावा लागला नाही कारण गोहत्या करण्याचे कुणाचेच धाडस झाले नाही. आज भारतभरात हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. महाराजांच्या बालपणी जी परिस्थिती होती, तीच आज भारतात झाली आहे. त्यामुळे महाराजांनी जो उपाय केला, तोच उपाय म्हणजे पुनःश्च हिंदवी स्वराज्य करणे, म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच सर्व समस्यांवर उपाय होय. मूठभर मावळ्यांनिशी पातशाह्यांना तुडवणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. आज बहुसंख्य हिंदू असूनही मूठभर धर्मांध देशाला वेठीस धरण्याची भाषा करत आहेत. यासाठी आपल्यातील मावळा जागृत करणे ही काळाची आवश्यकता आहे. युवक युवतींनी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन शक्तीची उपासना करायला हवी. देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पुढे यायला हवे.
फेसबूक आणि यू ट्यूब यांवर शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केलेले अभिप्राय !अनेकांनी ‘हा कार्यक्रम पुष्कळ चांगला झाला’, असे सांगितले आहे. ‘वक्त्यांच्या मार्गदर्शनातून तिथीनुसार सण साजरे करण्याविषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती समजली. अशा प्रकारचे कार्यक्रम हिंदु जनजागृती समितीने नियमितपणे आयोजित करावेत. या कार्यक्रमाचा यू ट्यूब वरील व्हिडिओ आपल्या परिचयातील अधिकाधिक हिंदूंना ‘शेअर’ करावा’, असे मत अनेकांनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केले आहे. डॉ. राजेंद्र गावस्कर, सिंधुदुर्ग – छत्रपती शिवरायांचे चरित्र वाचण्याची आणि अभ्यासण्याची आज नितांत आवश्यकता आहे. इतिहासतज्ञांनी खरे चरित्र पुराव्यानिशी जनतेसमोर आणून दांभिक आणि असत्य गोष्टींचा परखडपणे विरोध करावा. श्री. अनिल ढाणोलकर – हिंदू संघटित होत नाहीत, हीच शोकांतिका आहे. हिंदु हा राजकीय पक्षात वाटून गेलेला आहे. हिंदु देवतांवर विश्वास ठेवतोय; पण शिवरायांवर नाही. शिक्षित हिंदु मंदिरात जातो; पण शिवजयंतीत येत नाही. हिंदूंच्या मंदिरात शिवरायांची मूर्ती ठेवणे, हे स्वेच्छेनुसार बंधनकारक ठेवणे आवश्यक आहे. जय शिवराय ! श्री. चंद्रकांत राऊळ – काही हिंदू आपली जात हाच धर्म आहे, असे मानतात आणि जातीला चिकटून जीवन जगतात. ही विचारधारा पालटून हिंदु म्हणून जीवन जगून धर्मासाठी काम करावे. तृप्ती टाकसाळे – छत्रपती शिवाजी महाराजांनी वेद आणि प्रसिद्ध पुराण यांचे रक्षण केले. मुखात रामनाम ठेवले. हिंदूंचे रक्षण केले. शिपायांची रोटी राखली. खांद्यावरच्या जानव्याचे आणि गळ्यातल्या माळेचे रक्षण केले. अरुणा कुरणे – तिथीनुसार सण-समारंभ तसेच शिवजयंती का साजरी करावी ? याचे पुष्कळ चांगले मार्गदर्शन ऐकायला मिळाले. श्री. नामदेव मुळे – शिवजयंती तिथीनुसार साजरी करणे, हा चांगला निर्णय आहे. येथून पुढे आम्ही शिवजयंती तिथीनुसार साजरी करू. हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. समितीच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला शुभेच्छा ! जय छत्रपती शिवाजी महाराज, जय भारतमाता ! |
सनातनचे हात धरल्यास कुणाचे पाय धरावे लागणार नाहीत ! – विद्याधरपंत नारगोलकर, अध्यक्ष, पुणे सार्वजनिक सभा॥ श्रीराम समर्थ ॥ ‘आपण भाग्यवान आहोत; कारण आपल्याला आज हिंदु जनजागृती समिती सारखी समिती शिव जन्मदिन तिथीप्रमाणे साजरी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. त्यांनी पुनःश्च व्हावे हिंदवी स्वराज्य, या उपक्रमाची ‘ऑनलाईन’ चर्चा ठेवली, हे ऐकून मला ‘केसरी’ मधील लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या ‘पुनःश्च हरी ओम् ।’ या अग्रलेखाची आठवण आली; म्हणून मी म्हणतो, ‘‘तुम्ही सनातनचा हात धरा म्हणजे तुम्हाला कुणाचे पाय धरावे लागणार नाहीत.’’ ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ आपला बंधुवत, श्री. विद्याधरपंत नारगोलकर, अध्यक्ष, पुणे सार्वजनिक सभा. |