(म्हणे) ‘शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी अंगणवाड्यांतून इंग्रजीचे धडे देणार !’ – महिला आणि बालकल्याण सभापती
इंग्रजीतून शिक्षण दिल्यास शाळांचा दर्जा वाढतो, ही अंधश्रद्धा आहे. मातृभाषेतूनच किमान प्राथमिक शिक्षण घेतल्यास मुलांचा बुद्ध्यांक वाढतो, असे शिक्षणतज्ञांनी सांगितलेले असूनही अंगणवाड्यांमधून इंग्रजी शिकवण्याची दुर्बुद्धी होणे देशासाठी दुर्दैवी आणि भावी पिढीची हानी करणारेच ठरेल !
सावंतवाडी – जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी अंगणवाड्यांत शिकणार्या मुलांना इंग्रजी भाषेतून शिक्षणाचे प्राथमिक धडे देण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने काही ठिकाणी ‘पायलट प्रकल्प’ राबवण्यात येणार आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित महिला आणि बालकल्याण सभापती सौ. शर्वाणी गावकर यांनी व्यक्त केले. सभापतीपदी निवड झाल्यामुळे सावंतवाडी पंचायत समितीच्या माध्यमातून सौ. गावकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी प्रभारी सभापती शीतल राऊळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी सभापती मानसी धुरी, गौरी पावसकर, पंचायत समिती सदस्य बाबू सावंत, रवि मडगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी सौ. गावकर पुढे म्हणाल्या, ‘‘जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता म्हणावे तसे विद्यार्थी येत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे शाळांचा दर्जा सुधारण्याचा आमच्या समोर यक्षप्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर अंगणवाडीत शिक्षण घेणार्या मुलांना इंग्रजीचे शिक्षण दिले गेले, तर त्याचा लाभ निश्चितच भविष्यात मुलांना होईल आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वळणारी मुले या ठिकाणी सेमी इंग्रजीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांतून शिकतील. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.’’