दळणवळण बंदीच्या काळात आणि त्यानंतर ‘ऑनलाईन’ भावसत्संग घेण्याची सेवा करतांना साधिका सौ. क्षिप्रा जुवेकर यांना आलेल्या अनुभूती
दळणवळण बंदीच्या काळात आणि त्यानंतर ‘ऑनलाईन’ भावसत्संग घेण्याची सेवा करतांना ‘सर्व काही श्री गुरु करून घेत आहेत’, याविषयी साधिका सौ. क्षिप्रा जुवेकर यांना आलेल्या अनुभूती
३.४.२०२१ या दिवशी ‘ऑनलाईन भावसत्संगा’ला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने….
१. अकस्मात् दळणवळण बंदी घोषित झाल्यावर ‘आता प्रसारसेवा कशी करणार ?’, असा विचार मनात येणे आणि ‘प्राप्त परिस्थिती स्वीकारायची आहे’, या श्री गुरूंच्या शिकवणीमुळे मनातील विचार निघून जाणे
‘कोरोनाच्या काळात अकस्मात् एके दिवशी दळणवळण बंदीची (‘लॉकडाऊन’ची) सूचना आली. आम्ही त्या वेळी यावल (जळगाव) येथे प्रसारासाठी गेलो होतो. सूचना मिळाल्यावर आम्ही त्वरित जळगाव सेवाकेंद्रात परत आलो. माझी समष्टी प्रकृती असल्यामुळे ‘धर्मप्रसार करणे, त्या निमित्ताने साधकांच्या संपर्कात रहाणे’, हेच माझे जीवन आहे’, असे मला वाटत होते. आता दळणवळण बंदीमुळे ‘बाहेर पडायचे नाही’, हे कळल्यावर मला वाटले, ‘७ ८ दिवसांसाठी दळणवळण बंदी असेल’; पण नंतर बंदीचा हा कालावधी वाढतच गेला. मला कधी कधी वाटायचे, ‘जर मला प्रसारात जायला मिळाले नाही, साधक, धर्मप्रेमी यांच्याशी संपर्क करता आला नाही, तर काय करायचे ?’ त्याच वेळी ‘परिस्थिती स्वीकारायची आहे’, या श्री गुरूंच्या शिकवणीची जाणीव झाल्याने हे विचार मनातून निघून गेले.
२. ‘ऑनलाईन भावसत्संग’ घेण्याची मिळालेली संधी
२ अ. भावसत्संग घेण्याची सेवा मिळाल्यावर मनाची नकारात्मकतेकडून सकारात्मक दिशेने झालेली प्रक्रिया ! : १.४.२०२० या दिवशी सद्गुरु नंदकुमार जाधवकाका मला म्हणाले, ‘‘तुम्हाला आता ‘ऑनलाईन भावसत्संग’ घेण्याची सेवा करायची आहे.’’ तेव्हा मला वाटले, ‘माझ्यामध्ये भाव नाही, तर मी भावसत्संग कसे घेणार ?’ त्या वेळी सद्गुरु काकांनी माझ्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिले. जणू काही माझ्या मनातील विचार त्यांना कळले. त्यानंतर माझ्या मनात सकारात्मक विचार आला, ‘संतांनी सांगितले आहे, तर तेच माझ्याकडून ही सेवा करवून घेतील !’ त्या वेळी ‘भावसत्संगाची संहिता कोण लिहिणार ? छायाचित्रकाची (कॅमेराची) दिशा (अँगल) कशी असणार ? सत्संग घेतांना कपडे कसे असतील ?’, असे कोणतेच विचार माझ्या मनात आले नाहीत. केवळ ‘मला ही सेवा करायची आहे’, एवढाच विचार भगवंताने दिला आणि मला हे सर्व प्रत्यक्ष अनुभवता आले. मनाची स्थिती एवढी सकारात्मक रहाणे, हे सामान्य नाही, तर ही एक जादू आहे; कारण सर्व नियोजन आपोआप होत गेले. हे सर्व आमचे प्रयत्न नव्हतेच. दैवी शक्तीच सर्व करवून घेत होती.
२ आ. भावसत्संग घेण्याविषयी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी केलेले मार्गदर्शन ! : भावसत्संगांना आरंभ झाला. तेव्हा सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी मला मार्गदर्शन केले. प्रत्येक संहितेतील एकेक शब्द त्यांनी पडताळला. ‘कोणता शब्द कसा उच्चारायचा ? बोलण्याची गती किती असायला हवी ? बोलतांना भाव कसा हवा ?’, हे सर्व त्यांनी मला सांगितले. आजही त्या मला मार्गदर्शन करत आहेत.
ज्या दिवशी सत्संगाचे प्रथम चित्रीकरण होते, त्या दिवशी मी सद्गुरु अनुराधाताई आणि पू. सौ. जाधवकाकू यांना भ्रमणभाष केला. तेव्हा माझ्या मनावर पुष्कळ ताण आला होता. त्या मला म्हणाल्या, ‘‘क्षिप्रा, चिंता करू नकोस, ‘तुझ्या जागी आम्हीच आहोत’, असे आम्हाला वाटत आहे.’’ त्यांचा हा आशीर्वाद ऐकल्यावर ‘संतांनी संकल्प केला असून त्याच बोलणार आहेत. त्यांनी मला माध्यम बनवले आहे. ही त्यांची केवढी मोठी कृपा आहे’, असे वाटून मला आनंद झाला.
२ इ. गुरुदेवांनी समष्टी साधना करण्याची इच्छा ‘ऑनलाईन’ भावसत्संगांद्वारेे पूर्ण करणे आणि ‘दैवी ऊर्जेवरच हे सत्संग चालू आहेत’, हे प्रत्येक सत्संगानंतर लक्षात येणे : सद्गुरु जाधवकाकांकडून मला आशीर्वाद मिळाला आणि भावसत्संगांची गंगा वाहू लागली. या भावगंगेत प्रतिदिन संतांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या चैतन्यात डुंबण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे थकवा, भीती, निराशा किंवा नकारात्मकता यांचा ईश्वराने विसरच पाडला. ‘दैवी ऊर्जेवरच हे सत्संग चालू आहेत’, याचे प्रत्येक सत्संग हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. श्री गुरु किती देतात ! त्यांच्या देण्याला अंतच नाही. मी स्वप्नातही त्यांना जेवढे मागितले नसेल, तेवढे त्यांनी मला दिले आणि आताही ते भरभरून देत आहेत. मी ‘मला प्रसाराला जायला मिळणार नाही’, असा विचार करत होते आणि त्यांनी मला ‘ऑनलाइन’ सत्संगांच्या माध्यमातून संपूर्ण जगभरातील दर्शक-परिवारांशी जोडले.’
२ ई. संतांनी सत्संगातील बोलण्यात सहजता नसल्याचे सांगून चिंतन करण्यास सांगणे, त्या वेळी स्वतःतील अहंची जाणीव होऊन गुरुकृपेमुळे सत्संग घेण्याच्या पद्धतीत परिवर्तन होऊ लागणे : सत्संग घेण्याच्या या सेवेत माझ्याकडून अनेक चुका झाल्या. माझ्या बोलण्याची गती अती जलद आहे. संतांनी याविषयी मला सांगितल्यावर माझ्यात काही प्रमाणात सुधारणा झाली; पण मला सत्संगात सहजतेने बोलणे जमत नव्हते. तेव्हा संतांनी मला एका महिला कथाकाराच्या प्रवचनाची ‘लिंक’ पाठवली आणि त्याचा अभ्यास करायला सांगितले. तेव्हा मला वाटले, ‘मी सनातन संस्थेमध्ये आहे. कथाकार केवळ बोलतात; परंतु म्हणावी तेवढी साधना करत नाहीत.’ त्या वेळी माझ्या मनाला या अहंयुक्त विचारांची जाणीव नव्हती. नंतर संतांनी मला ‘अजूनही बोलण्यात सहजता अल्प आहे’, असे सांगून ते सुधारण्यासाठी चिंतन करण्यास सांगितले. त्या वेळी ‘मी स्वतःला श्रेष्ठ समजत आहे. समाजातील कीर्तनकारांविषयी मला आदर नाही’, याची मला जाणीव झाली. संतांच्या वाणीतील चैतन्यामुळे मला त्या कीर्तनकाराचे गुण पहाता आले. त्यांचीही साधना आहे, याविषयी आदर निर्माण झाला. ‘मुख्य म्हणजे माझ्यात शिकण्याची वृत्ती वाढली पाहिजे’, हे संतांच्या कृपेने ईश्वराने माझ्या लक्षात आणून दिले. या अभ्यासामुळे मला अनेक लाभ झाले. सत्संग घेण्याच्या माझ्या पद्धतीतही परिवर्तन होत गेले. ‘समोर कुणी श्रोता असो वा नसो, माझ्यासमोर श्री गुरु आहेत, सर्व देवता उपस्थित आहेत’, याची जाणीव संतवाणीने मला करवून दिली.
३. दळणवळण बंदी लागू होण्यापूर्वीच चित्रीकरणासाठी योग्य अशा साड्यांची सिद्धता करणे आणि ‘सर्व ईश्वरी नियोजनानुसार होत आहे’, याची अनुभूती येणे
सत्संग चालू झाल्यावर चित्रीकरणाच्या दृष्टीने साड्यांची सिद्धता करणे अतिशय महत्त्वपूर्ण होते; परंतु हेसुद्धा ‘पूर्वनियोजित कसे होते ?’, याविषयी मला आलेली अनुभूती पुढे दिली आहे. एक वर्षापूर्वी अधिवेशनाचे सूत्रसंचालन करतांना चित्रीकरणाला लागणार्या योग्य साड्या माझ्याकडे नव्हत्या. तेव्हा कु. प्रियांका लोटलीकर या साधिकेने पुढील वर्षाच्या अधिवेशनासाठी चित्रीकरणास योग्य असलेल्या ५ साड्या माझ्याकडून खरेदी करून घेतल्या. माझ्या आईनेही मला ४ साड्या पाठवल्या. फेब्रुवारी मासात माझ्या मनात अकस्मात् विचार आला, ‘या सर्व साड्या नीट सिद्ध करून ठेवायला पाहिजेत.’ मी मुद्दाम वेळ काढून या साड्यांवरचे ब्लाऊज शिवून घेतले. वास्तविक पूर्वनियोजन करून एवढे मास आधी सिद्धता करणे, हा माझा स्वभाव नाही. हे सर्व करतांनाही मला आतून वाटत होते की, अधिवेशनाला अनेक दिवस शेष आहेत, तर या सर्व कृती मी आतापासून का करत आहे ?; परंतु ईश्वरी शक्ती हे सर्व पूर्ण करवून घेत होती.
‘२८ मार्चपासून सत्संगाच्या चित्रीकरणासाठी साड्या हव्यात’, असे मला कळले. तेव्हा ‘ईश्वराने त्याच्या नियोजनानुसार माझ्याकडून ही सर्व सिद्धता आधीच करवून घेतली होती’, याची मला अनुभूती आली. याचे कारण दळणवळण बंदीच्या काळात एवढ्या साड्यांवरचे ब्लाऊज शिवून घेणे शक्य नव्हते.
हा एक लहानसा प्रसंग आहे, ज्यातून लक्षात येते की, ईश्वर त्याच्या नियोजनानुसार सर्व करवून घेतो आणि तोच कर्ता-करविता आहे.
४. भावसत्संगाप्रती सौ. क्षिप्रा यांचा भाव
४ अ. सत्संगात बसावयाच्या आसंदीप्रती असलेला उत्कट भाव ! : अनेक वेळा सत्संगाच्या वेळी मला वाटते, ‘भरताने श्रीरामाच्या पादुकांसाठी सिंहासन बनवले होते. त्याने १४ वर्षे श्रीरामाच्या पादुकांची पूजा केली. त्याप्रमाणे मला सत्संगात बसायला दिलेली आसंदी म्हणजे श्री गुरुचरण पादुकांचे सिंहासन आहे आणि मी त्यांच्या पादुकांना लागलेला धूलीकण आहे.’
४ आ. सत्संगात स्वतः बोलत नसून ‘ती श्री गुरुवाणी आहे’, असे वाटणे : सत्संगाच्या आधी प्रार्थना केल्यावर मला वाटते, ‘माझ्यासमोर गणपति, श्रीकृष्ण, श्रीविष्णु आणि श्री महालक्ष्मीदेवी अशा सर्व देवता आहेत अन् मी त्यांच्या चरणांशी बसून हा सत्संग ऐकत आहे.’ त्यामुळे सत्संग झाल्यानंतर अनेकदा मला ‘मी सत्संगात बोलले आहे’, असे वाटायचे नाही; कारण मी काही बोलूच शकत नाही. ही श्री गुरुवाणीच आहे आणि मला मात्र ऐकण्याचा आनंद मिळत आहे.
४ इ. सत्संगात संतांविषयी किंवा ईश्वरी लीलेचे वर्णन करतांना भावाश्रू अनावर होणे आणि याचे पू. (सौ.) संगीता जाधव यांनी विश्लेषण केल्यावर भावमय वातावरण निर्माण होण्यामागील कारण उमगणे : काही वेळा सत्संगात संतांविषयी किंवा ईश्वराच्या लीलेचे वर्णन सांगत असतांना मला भावाश्रू अनावर व्हायचे. त्या वेळी किंवा चित्रीकरणाच्या वेळी अश्रू यायला नकोत, याची मला काळजी घ्यावी लागायची. याविषयी मी पू. जाधवकाकूंना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘आपण सत्संगात एखाद्या संतांची महती सांगणारा प्रसंग सांगतो. तेव्हा सूक्ष्मातून त्या संतांचे तेथे आगमन होते. नंतर त्यांचे शिष्यही आपल्या गुरूंचा महिमा ऐकायला सूक्ष्मातून तेथे येतात.’’ तेव्हा ‘या सर्वांच्या दिव्य उपस्थितीमुळे सत्संगात भावमय वातावरण निर्माण होते’, असे माझ्या लक्षात आले.
५. सत्संग पहाणार्या दर्शकाला आलेल्या अनुभूतीतून ‘श्री गुरुच सेवा करून घेत आहेत’, याविषयी साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता
५ अ. ‘स्वामी विवेकानंद शिकागोमध्ये जगप्रसिद्ध भाषण देतांना त्यांच्या मागे त्यांचे गुरु उभे होते’, असे एका व्यक्तीला दिसणे आणि ‘ऑनलाईन भावसत्संग घेतांना साधिकेच्या मागे श्रीकृष्ण उभा आहे’, अशी अनुभूती एका दर्शकाला येणे : एकदा एका सत्संगात मी स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील पुढील प्रसंग सांगितला, ‘स्वामी विवेकानंद शिकागोतील धर्मपरिषदेत भाषण देत होते. त्या वेळी एका व्यक्तीला स्वामी विवेकानंदांच्या मागे त्यांचे गुरु उभे असल्याचे दिसले. त्याने हे स्वामींना सांगितले. तेव्हा स्वामी म्हणाले, ‘‘मी तर केवळ एक ध्वनीक्षेपक (माईक) आहे. बोलणारे मागे उभे असलेले श्री गुरुच आहेत. जोपर्यंत ते ध्वनीक्षेपक चालू करणार नाहीत, तोपर्यंत त्यातून आवाज येणार नाही.’’ त्यांचे हे वाक्य माझ्या अंतर्मनापर्यंत गेले. अशीच अनुभूती प्रतिदिन ईश्वर मला देत आहे. मी केवळ ध्वनीक्षेपक आहे. माझे कसलेच कर्तृत्व नाही. जोपर्यंत श्री गुरु ध्वनीक्षेपक (माईक) चालू करणार नाहीत, तोपर्यंत तो काहीच करू शकत नाही. सत्संगातील वाणी श्री गुरूंचीच आहे. या सेवेसाठी गुरूंनी मला माध्यम बनवले आहे. यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कितीही जन्म घेतले, तरी ते अल्पच आहेत. श्री गुरु सत्संगाच्या माध्यमातून प्रतिदिन मला त्यांचे कीर्तन करण्याची संधी देत आहेत, त्यांच्या गुणांचे श्रवण करण्याची संधी देत आहेत.
‘भावसत्संगात श्री गुरुच बोलतात’, याचे प्रत्यक्ष प्रमाण एका दर्शकाने सांगितले. त्यांना सत्संगात माझ्या मागे श्रीकृष्ण उभा असल्याचे दिसले. श्रीकृष्णच सत्संगात बोलतो. मी जेव्हा भावसत्संग ऐकते, तेव्हा तो आवाज मला माझा वाटत नाही. मला वाटते, ‘रामनाथी आश्रमातून भावसत्संग घेणार्या साधिकेचा तो आवाज आहे.’ ईश्वर रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेऊ शकतो. त्याप्रमाणे तो मला माध्यम बनवून भावसत्संगांचे भावतरंग संपूर्ण जगभरात पसरवत आहे.
५ आ. साधिकेच्या माध्यमातून श्री गुरु बोलत असल्याने दर्शकांनी केलेली तिची प्रशंसा ही श्री गुरूंचीच प्रशंसा असल्याचे साधिकेला वाटणे : साधक आणि दर्शक म्हणतात, ‘‘क्षिप्राताईचा आवाज किती मधुर आहे, तिचा आवाज अंतर्मनापर्यंत जातो’’; पण ‘हे श्रीविष्णु, हा कंठ आणि या कंठात आवाज देणारा तूच आहेस. कितीतरी लोक आहेत की, ज्यांना कंठ आहे; पण आवाज नाही. तू मला जो आवाज दिला आहेस, त्याची प्रशंसा ही तुझीच प्रशंसा आहे. सत्संगाच्या संहितेतील प्रत्येक शब्द तूच आहेस, प्रत्येक भाव तूच आहेस. त्यामुळे सर्वांना सत्संग चांगला वाटतो. ‘सत्संगात तूच बोलत आहेस’, हे त्रिवार सत्य आहे. सर्व समाजाला मला ओरडून सांगण्याची तीव्र इच्छा होते, ‘बघा, गुरुकृपेने कुणी कसे बोलू शकतो. गुरु आपले कार्य करवून घेण्यासाठी, धर्मप्रसारासाठी कुणालाही माध्यम बनवू शकतात. ते सर्वकाही करू शकतात आणि त्यासाठी त्यांनी जर आपल्याला माध्यम बनवले, तर यापेक्षा मोठे सौभाग्य आणखी दुसरे काय असू शकते ?’
५ इ. जीवनातील प्रत्येक क्षणावर श्री गुरूंचे नियंत्रण असल्याने कोणत्याही अडथळ्यांविना मागील ८ मासांपासून सत्संग घेता येणे : अनेक वेळा भावसत्संगात घ्यायचा विषय वाचतांना श्री गुरु काही वेगळी भावसूत्रे सुचवतात आणि प्रत्यक्ष सत्संगातही माझ्याकडून इतर सूत्रेही सांगितली जातात. तेव्हा लक्षात येते की, सत्संगाच्या प्रत्येक क्षणावर श्री गुरूंचे नियंत्रण आहे. केवळ सत्संगच नाही, तर जीवनातील प्रत्येक क्षणावर त्यांचेच नियंत्रण आहे. मागील ८ मासांपासून मला कोणत्याही प्रकारचा शारीरिक आजार झाला नाही की, ज्यामुळे या सेवेत खंड पडेल. हे कसे शक्य आहे ? ही केवळ गुरुकृपाच आहे. गुरुकृपेच्या ऊर्जेमुळे ईश्वर मला सेवेची संधी देत आहे. ही गुरूंची माझ्यावर पुष्कळ मोठी कृपा आहे.
६. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘हे प्रभु, हे श्रीमन्नारायणस्वरूप गुरुमाऊली, ही सेवा आपणच करत आहात. ही सेवा सर्व संत आणि सद्गुरु करत आहेत’, हेच त्रिवार सत्य आहे. आम्ही साधक कणमात्रसुद्धा कृती करू शकत नाही; परंतु नेहमीप्रमाणे आपण स्वतःकडे कर्तेपणा घेत नाही आणि साधकांची प्रशंसा करता. हे श्री गुरु, ‘आपल्या या कृपेसाठी शब्दांतून कृतज्ञता कशी व्यक्त करू ?’, हे मला समजत नाही. आपण आम्हाला जे शिकवत आहात, ते सर्व आमच्या अंतःकरणात जावे आणि आम्ही आपल्या कोमल श्री चरणी कायमस्वरूपी स्थान मिळवण्यास पात्र व्हावे’, अशी आपल्या चरणकमली शरणागतपूर्वक प्रार्थना !’
– सौ. क्षिप्रा जुवेकर, जळगाव (१२.१२.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |