दळणवळण बंदीच्या निर्बंधामुळे रिक्शा व्यावसायिक संतप्त !
सरकारविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
सातारा, १ एप्रिल (वार्ता. ) – कोरोनाचा संसर्ग आणि दळणवळण बंदी यांमुळे रिक्शा व्यावसायिक अडचणीत आहेत. त्यातच नवीन निर्बंधामुळे त्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. सरकारने या धोरणांचा पुनर्विचार करावा, या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र कामगार आणि कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या नावे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देण्यात आलेल्या मागण्यांच्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, रिक्शाच्या नोंदणी शुल्कात वाढ करण्यात येऊ नये, नोंदणी आणि ‘फिटनेस’ शुल्क आकारणी पूर्वीप्रमाणेच करण्यात यावी, नोंदणीस विलंब झाल्यास प्रतिदिन आकारण्यात येणारा ५० रुपये दंड मागे घेण्यात यावा, रिक्शासाठी स्वतंत्र विमा गट करण्यात यावा. सर्वच रिक्शा व्यावसायिक हे सामान्य कुटुंबातील आहेत. दळणवळण बंदीमुळे काही रिक्शा व्यावसायिकांचे अधिकोषांचे कर्ज हप्ते थकले आहेत. याचाही सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा.