शासनाला आपल्याला वेठीस धरायचे नाही, त्यामुळे आपले भजन सत्याग्रह आंदोलन थांबवत आहे ! – ह.भ.प. बंडातात्या कराडकर
वारकरी, तसेच हिंदु समाज हा नेहमीच सामंजस्याची भूमिका अंगीकारून निमूटपणे निर्बंध स्वीकारतो; पण राजकीय पक्षांकडून सर्व नियमांचे उल्लंघन करून चालू असलेला राजकीय प्रसार आणि सभा यांवर निर्बंध घालण्याचा साधा विचारही होतांना दिसत नाही.
पुणे, १ एप्रिल – वारकरी संप्रदाय हा मानवता जपत आला आहे. ‘कोणत्याही जिवाचा न घडो मत्सर’ ही वारकरी संप्रदायातील शिकवण आहे. शासनाला आपल्याला वेठीस धरायचे नाही. त्यामुळे आपले भजन सत्याग्रह आंदोलन थांबवण्यात येत आहे. प्रशासनाने वारकर्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. नांदेडमधील गुरुद्वारा हा एक दिवसही बंद नव्हता; कारण त्यांच्यामध्ये एकी होती. देहू येथील गावकर्यांनी जिल्हाधिकार्यांना समजावून सांगायला हवे होते. वारकरी धर्म हा मानवता धर्म पाळतो. मद्याची दुकाने चालू आणि त्यांच्याकडून हप्ते घेणार, हे कुठल्या मानवता धर्मात बसते ? तसेच येणारी आषाढी वारी पायी होणार कि नाही याचे उत्तर द्यावे ?, असे प्रश्न ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी उपस्थित केले.
संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकर्यांना अनुमती द्यावी, या मागणीसाठी २८ मार्च या दिवशी अनुमाने २५० वारकर्यांनी देहूच्या वेशीवर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्यासह भजन आंदोलन केले होते.