पुणे येथे वर्षभरात १७५ बालगुन्हेगारांची भर !
बालगुन्हेगारीचे वाढते प्रमाण देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे. विद्यार्थ्यांना धर्माधिष्ठित नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले असते, तर आज ही वेळ आली नसती.
पिंपरी, १ एप्रिल – येथे गेल्या वर्षी अनुमाने १७५ बालगुन्हेगारीचे गुन्हे नोंदवले गेले. या गुन्ह्यांत २५६ विधिसंघर्षित (आर्थिक आबाळ, पालकांचे दुर्लक्ष, व्यसने आणि ‘थ्रिल’ अनुभवायची मानसिकता यांमुळे अनेक मुले गुन्हेगारीच्या परत न येणार्या वाटेवरच प्रवास चालू करत आहेत. बालगुन्हेगार कायद्यानुसार अशा गुन्हेगारांना ‘विधिसंघर्षग्रस्त’ म्हणतात.) मुला-मुलींना कह्यात घेतले आहे. प्राप्त आकडेवारीनुसार या गुन्ह्यात ४ मुलींचाही समावेश आहे. २५६ पैकी २५२ गुन्हे मुलांकडून घडलेले असून, निगडी पोलीस ठाण्यांत ते सर्वाधिक आहेत. या बालकांच्या हातून हत्या, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी, वाहन चोरी, विनयभंग, बलात्कार यांसारखे गंभीर गुन्हे घडले आहेत.
वयाच्या १८ वर्षाखालील आरोपींना विधिसंघर्षग्रस्त बालके म्हटले जाते. या आरोपींवर भारतीय दंडविधान म्हणजे आयपीसीअंतर्गत गुन्हे नोंद होतात.
साहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी सांगितले, ‘‘पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतून विशेष बाल पथक गुन्हे शाखेच्या वतीने शहरातील विधिसंघर्षग्रस्त बालक, दिशा भरकटलेले अल्पवयीन बालक यांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रोजगार मेळावे, कर्ज मेळावे घेऊन अशा बालकांची शक्ती योग्य दिशेवर आणण्यासाठी काम करण्यात येत आहे.’’ (अशा मुलांना गुन्हे करण्यापासून रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण आणि साधना सांगणे अत्यावश्यक आहे. – संपादक)