पिंपरी-चिंचवड येथील खासगी रुग्णालयांनी राखीव खाटांची माहिती न दिल्यास कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश !
पिंपरी-चिंचवड (पुणे), १ एप्रिल – येथील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी राखीव खाटा ठेवण्यात आल्या आहेत; परंतु अशा खाटांची माहिती उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची तारांबळ होत आहे. खासगी रुग्णालयांनी सातत्याने अशी माहिती दर्शवणारे सूचनाफलक लावावेत, अशी सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे. खाटांची माहिती ‘वॉररूम’कडे न दिल्यास कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासनास दिले आहेत.
महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त दालनात ३० मार्च या दिवशी बैठक झाली. त्यामध्ये कोरोना रुग्णांना भेडसावणार्या समस्या, महापालिका आणि खासगी रुग्णालय येथे भविष्यात लागणार्या खाटा, अधिकाधिक नागरिकांनी कोव्हिशिल्ड लसीकरण करून घेणे, लसीकरण केंद्रे वाढवणे इत्यादी विषयांवर चर्चा झाली.