माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन
मूळ गावी पुसेगाव येथे शासकीय मानवंदना देऊन अंत्यसंस्कार
सातारा, १ एप्रिल (वार्ता.) – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी.एन्. उपाख्य धनंजय जाधव (वय ७४ वर्षे) यांचे नवी मुंबई येथील नेरूळ येथे खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर शासकीय मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
न्यायप्रिय, प्रामाणिक, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची पोलीस दलामध्ये ओळख होती. जाधव यांच्या निधनाचे वृत्त समजताच पुसेगावावर शोककळा पसरली. काही काळासाठी पुसेगाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. अंत्यसंस्काराच्या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, शिवसेना नेते नरेंद्र पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.