राज्य सरकारने संभाव्य दळणवळण बंदीचा निर्णय मागे घ्यावा ! – भाजपचे कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्यांना निवेदन
कोल्हापूर, १ एप्रिल – राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोल्हापूर शहरात प्रशासनाच्या वतीने रात्री ८ वाजताच दुकाने आणि व्यवसाय बंद करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात दबावतंत्र वापरले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना महामारीचे फार मोठे संकट दिसत नसतांनाही राज्य सरकारने रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत कडक निर्बंध लादण्याचे कारणच काय ? राज्य सरकारकडूनही दळणवळण बंदी करण्याविषयी विधाने केली जात आहेत. सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यापारी, फेरीवाले, छोटे-मोठे उद्योगधंदे पुन्हा एकदा उभारी घेत असल्याने राज्य सरकारने संभाव्य दळणवळण बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशा मागणीचे निवेदन भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना ३१ मार्च या दिवशी देण्यात आले.
या प्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुति भागोजी, चंद्रकांत घाटगे, सचिन तोडकर, चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष विक्रम राठोड, महिला अध्यक्षा गायत्री राऊत यांसह अन्य उपस्थित होते.