कुंभमेळ्यामध्ये दिवसाला कोरोनाच्या ५० सहस्र चाचण्या करण्याचे उत्तराखंड उच्च न्यायालयाचे आदेश

 हरिद्वार – १ एप्रिलपासून चालू झालेल्या कुंभमेळ्यामध्ये कोरोनाच्या प्रतिदिन ५० सहस्र चाचण्या करण्याचे आदेश उत्तराखंड उच्च न्यायालयाने दिले आहेत. कुंभमेळा क्षेत्रातील सर्व वाहनतळ आणि स्नानघाट या ठिकाणी फिरती वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात यावीत. ज्यांनी कोरोनाची पहिली लस घेतली आहे, त्यांनाही कोरोनाचा ‘निगेटिव्ह’ (नकारात्मक) अहवाल आणणे सक्तीचे करण्यात आले आहे. ‘कुंभमेळा क्षेत्रातही कोरोनाचे लसीकरण करण्यात यावे’, असेही उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

जिल्ह्याच्या सर्व सीमांवर वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आली आहेत. कुंभमेळ्याला येणार्‍या सर्व भाविकांचा ७२ घंटे अगोदरचा कोरोनाचा ‘निगेटिव्ह’ अहवाल पडताळणी करूनच त्यांना जिल्ह्याच्या आत प्रवेश दिला जाणार आहे. तसेच कुंभमेळा क्षेत्रासह राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमांवर कोरोनाची ‘रॅपिड’ चाचणी करण्यात येणार आहे.

कुंभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वादळी वारा

कुंभमेळा क्षेत्रामध्ये ३१ मार्चला दुपारी २ वाजल्यापासून ते ४ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर वादळी वारा सुटला होता. याचा विशेष परिणाम बैरागी आखाड्यामध्ये जाणवला. हा आखाडा नदीच्या पात्रातील वाळूवर निर्माण करण्याचे कार्य चालू आहे. तसेच येथे शेकडोहून अधिक आखाड्यांचे तंबू बांधण्याचे काम चालू आहे. वार्‍याचे वावटळ निर्माण झाल्याने या आखाड्यातील काही परिसर धुळीने झाकळून गेला होता. वार्‍याने काही आखाड्यांची संरचना डळमळीत झाली, तसेच वाळू उडून ती सर्वांच्या नाकातोंडात जात होती.