वाई (सातारा) येथील खासगी वीजदेयक भरणा केंद्राकडून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक

नागरिकांनीच उघडकीस आणली चोरी; कारवाईची मागणी

प्रतीकात्मक छायाचित्र

सातारा, १ एप्रिल (वार्ता.) – वाई (जिल्हा सातारा) शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका खासगी वीजदेयक भरणा केंद्राने नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. खासगी वीजदेयक भरणा केंद्राने यासाठी महावितरणची कोणतीही अनुमती घेतली नसल्याने महावितरणचीही फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही चोरी स्थानिक नागरिकांनी उघडकीस आणली असून संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे. (२ मास विजेचे पैसे मिळाले नाहीत, तर महावितरणचे अधिकारी झोपले होते का ?- संपादक)

खासगी वीजदेयक भरणा केंद्राने जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ या कालावधीतील नागरिकांनी भरलेली लाखो रुपयांची वीजदेयके महावितरणकडे भरलीच नाहीत. (यामध्ये अन्य काही भ्रष्टाचार झाला का ? हेसुद्धा पहावे लागेल ! – संपादक) जेव्हा वीजजोडणी तोडण्यासाठी महावितरणचे कर्मचारी ग्राहकांच्या दारात गेले, तेव्हा ही गोष्ट उघडकीस आली. याविषयी सामाजिक कार्यकर्ते विवेक भोसले, शिवसेना उपतालुकाप्रमुख गणेश जाधव यांनी अचानक या बोगस खासगी वीजदेयके भरणा केंद्रास भेट दिली. तेव्हा याविषयी जाब विचारल्यावर भोसले आणि जाधव यांना केंद्रावरील कर्मचार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

योग्य ती कारवाई केली जाईल ! – महावितरण

बोगस वीजदेयके भरणा केंद्रात भरणा केलेल्या ग्राहकांनी आपल्या रकमेची तात्काळ निश्‍चिती करून घ्यावी. याविषयी काही शंका असल्यास महावितरण कार्यालयाकडे तक्रार करावी. चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन महावितरणचे उपअभियंता पंकज गोंजारी यांनी दिले आहे.