कणकवली शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्थलांतरास विरोध
शाळेची भूमी भालचंद्र महाराज संस्थानला देण्याचा प्रस्ताव
कणकवली – शहरातील सद्गुरु भालचंद्र महाराज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ३ चे स्थलांतर करून ती भूमी भालचंद्र महाराज संस्थानाला हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. हे सर्व प्रयत्न मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून भालचंद्र महाराज संस्थानच्या वतीने करण्यात येत आहेत. या शाळेचे स्थलांतर करण्यास आमचा तीव्र विरोध असल्याचे ‘शाळा बचाव संघर्ष समिती’च्या वतीने शहरातील पाटकर कॉम्प्लेक्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
याविषयी समितीच्या वतीने मांडण्यात आलेली सूत्रे
१. सर्वाधिक पटसंख्या असलेली नेमकी ही शाळा का स्थलांतरित केली जात आहे ? त्याच्या मागचा नेमका उद्देश काय ? गेली ४ वर्षे हा प्रयत्न असून शाळा व्यवस्थापन समितीला गेल्या ४ वर्षांत कधीही विश्वासात का घेतले गेले नाही ?
२. ४ वर्षांपूर्वीही या प्रयत्नांना आम्ही विरोध केला होता. आता पुन्हा शाळा अस्थिर करण्याचा हेतू काय आहे ? या शाळेच्या जवळ असलेल्या हायस्कूलचा प्राथमिक विभाग पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी ही शाळा अस्थिर केली जात नाही ना ?
३. आमचा देवस्थानला विरोध नाही; मात्र शाळा आहे तेथेच राहिले पाहिजे, ही आमची भूमिका आहे.
४. शहरातील अनेक शाळा बंद पडल्या आहेत. सर्वाधिक पटसंख्या असलेली ही शाळा तशाच पद्धतीने बंद करण्याचा घाट घातला जात आहे का ? पुढील काळात आम्ही शाळेच्या समर्थनासाठी सह्यांची मोहीम राबवणार आहोत.
५. मारुति आचरेकर यांनी त्यांची परिस्थिती हलाखीची असूनही बहुजनांची मुले या शाळेत शिकावीत, यासाठी शाळेला विनामोबदला भूमी दिली. या वेळी शाळा बचाव संघर्ष समितीचे विष्णु राणे, बाळकृष्ण कांबळे, सायली राणे, दिलीप मालाडकर आदी उपस्थित होते.
शाळेची भूमी हस्तांतरित करण्याविषयी आज बैठक
कणकवली – शहरातील शाळा क्रमांक ३ ची भूमी भालचंद्र महाराज संस्थानाला हस्तांतरित करण्याविषयी १ एप्रिल या दिवशी दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकार्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कणकवली नगरपंचायतीचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिली.