दिवसभरात कोरोनाबाधित २०० नवीन रुग्ण गोव्यात रुग्णांच्या संख्येचा वाढता आलेख कायम
पणजी, ३१ मार्च (वार्ता.) – राज्यात कोरोनाच्या संसर्गात वाढ होत आहे. दिवसभरात २ सहस्र ३५२ चाचण्या करण्यात आल्या. यांपैकी २०० नवीन रुग्ण सापडले आहेत. राज्यात सलग गेले ६ दिवस कोरोनाबाधित नवीन रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केल्यानंतर आता रुग्णसंख्या द्विशतकावर पोचली आहे. ३१ मार्च या दिवशी कोरोनामुळे एका रुग्णाचे निधन झाले, तर प्रत्यक्ष उपचार घेणार्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता १ सहस्र ५५६ वर पोेचली आहे.
उत्तर गोव्यात समुद्रकिनार्यांवर मास्क न घालता फिरणार्या पर्यटकांवर पोलिसांची कारवाई
पणजी – पोलिसांनी पेडणे, हणजूण आणि कळंगुट या उत्तर गोव्यातील समुद्रकिनारपट्टीवर मास्क न घालता फिरणार्या पर्यटकांवर कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. पेडणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०२१ मध्ये कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याच्या प्रकरणी ९५७ प्रकरणे नोंद करून संबंधितांकडून एकूण १ लाख ८६ सहस्र रुपये दंडस्वरूपात गोळा करण्यात आले, तर वर्ष २०२० मध्ये मास्क न घालणार्या एकूण २ सहस्र ६०० लोकांना दंड ठोठावून त्यांच्याकडून एकूण ३ लाख २९ सहस्र रुपये दंडस्वरूपात गोळा करण्यात आले. कळंगुट पोलिसांनी मागील ३ मासांत २ सहस्र पर्यटकांवर गुन्हे प्रविष्ट करून त्यांच्याकडून सुमारे ४ लाख रुपये दंडस्वरूपात गोळा केले आहेत. मास्क घालणे आणि सामाजिक अंतर पाळणे यांविषयी कळंगुटचे पोलीस समुद्रकिनार्यावर जागृतीही करत आहेत.