दाणोली येथील समर्थ साटम महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !
सावंतवाडी – तालुक्यातील दाणोली येथील समर्थ साटम महाराज यांचा ८४ वा पुण्यतिथी सोहळा त्यांच्या येथील समाधी मंदिरात ३० मार्चला कोरोनाच्या नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करण्यात आला.
यानिमित्त समाधी मंदिरात काकड आरती, त्यानंतर सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खेमसावंत भोसले यांच्या हस्ते समाधीचे पूजन आणि पादूका पूजन करण्यात आले. दुपारी महाआरती करण्यात आली, तर रात्री समाधी मंदिर परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. प्रतिवर्षी सहस्रावधी भाविकांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा यावर्षी समाधी मंदिर समितीचे पदाधिकारी आणि सेवेकरी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या वेळी कोरोनाचे नियम पाळून काही भाविकांनी समर्थ साटम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
समर्थ साटम महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘आमची एकजूट’ या त्रैमासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन समर्थ साटम महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गेली २१ वर्षे प्रतिवर्षी ‘आमची एकजूट’ या त्रैमासिकाच्या वतीने त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा विशेषांक प्रकाशित केला जातो. यावर्षी २२ वा विशेषांक प्रकाशित करून ‘आमची एकजूट’, या त्रैमासिकाने ही सेवा समर्थ साटम महाराजांच्या चरणी अर्पण केली. या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा रत्नेश प्लाझा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या वेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी ‘आमची एकजूट’ या मासिकाचे, तसेच ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल’चे संपादक सीताराम गावडे यांचे कौतुक केले. या वेळी खांडेकर म्हणाले, ‘‘सलग २२ वर्षे यशस्वीपणे समर्थ साटम महाराजांच्या जीवनावर विशेषांक प्रसिद्ध करणे हे कौतुकास्पद आहे. आजच्या भ्रमणभाषच्या युगात अडकलेल्या तरुणांना भक्तीमार्गाकडे वळवण्यासाठी हा अंक उपयुक्त ठरेल. संतांच्या कथा तरुणपिढीच्या वाचनात आल्या, तर ही पिढी सत्मार्गाकडे वळेल. समर्थ साटम महाराजांच्या जीवनावर ‘आमची एकजूट’चा शंभरावा विशेषांकही प्रकाशित व्हावा, अशा शुभेच्छा !’’ या वेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासो बाबर, डॉ. दत्ता सावंत, उपनगराध्यक्ष सौ. अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह पत्रकार, तसेच उपस्थित अन्य मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले.