हिंदूंच्या मंदिरांसह अन्य धार्मिक स्थळांसाठीही कोरोना नियम बंधनकारक करावेत ! – विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांची निवेदनाद्वारे प्रांताधिकार्यांकडे मागणी
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), ३१ मार्च (वार्ता.) – केवळ हिंदूंचे सण आणि मंदिरे यांवर कोरोनाविषयीचे नियम बंधनकारक करण्यासमवेतच अन्य धार्मिक स्थळांसाठीही नियम बंधनकारक करावेत, या मागणीचे निवेदन विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना ३० मार्च या दिवशी देण्यात आले. (कोरोनाविषयक नियम जर सर्वांना सारखे आहेत, तर हिंदु संघटनांना निवेदन देऊन अशी मागणी का करावी लागते ? त्यामुळे हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात कोणत्याही नियमाची कार्यवाही केवळ हिंदूंना आणि इतरांना त्यातून सूट असे नागरिकांना वाटल्यास नवल ते काय ! – संपादक)
प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संसर्गामुळे हिंदूंच्या विविध सणांवर प्रशासनाकडून कायम निर्बंध लादण्यात येतात आणि सहिष्णु हिंदू त्यांचे पालनही करत आहेत; मात्र अन्य धार्मिक स्थळांच्या ठिकाणी दिवसातून ५ वेळा शेकडो जण एकत्र येतात. तेथे मात्र कोणताही शासन नियम किंवा प्रबोधन केले जात नाही. यातून कोरोना केवळ हिंदु सणांना आणि केवळ हिंदूंना होतो, असा संदेश जातो. त्यामुळे कोरोनाविषयीचे सर्व नियम आणि अटी या सर्व धर्मियांना लागू कराव्यात.
या वेळी शहरमंत्री श्री. प्रवीण सामंत, बजरंग दल संयोजक श्री. संतोष हत्तीकर, सर्वश्री पंढरीनाथ ठाणेकर, रणजित पवार, सचिन जनवाडे, बाळासाहेब ओझा, गौरव ठोंबरे, अनिल साळुंखे, अभिषेक देसाई, निखिलराजे आवळे यांसह विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.