लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा, डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा अन्यथा मागील वर्षीसारखी स्थिती पुन्हा अनुभवावी लागेल !
धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचे गोमंतकियांना आवाहन
तपोभूमी (गोवा), ३१ मार्च (वार्ता.) – ४५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांनी कोरोनाची लस घ्यावी. राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत आता वाढ होत आहे. कोरोनाचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यास हळूहळू कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या उणावू लागेल. कोरोना महामारीशी संबंधित सर्वांनी सरकारी नियम, तसेच डॉक्टरवर्ग वेळोवेळी देत असलेल्या सर्व सूचना यांचे काटेकोरपणे पालन करावे. असे न केल्यास पुन्हा आम्हाला गतवर्षीसारखा काळ पुन्हा भोगावा लागणार आहे. कोरोनाची लस मोठे नेते आणि डॉक्टर यांनी घेतली आहे. कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन कोरोना विषाणू नष्ट करण्याच्या कार्याला सर्वांनी हातभार लावूया, असे आवाहन तपोभूमी, कुंडई येथील पिठाधीश धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी केले आहे. सामाजिक माध्यमांत प्रसारित करण्यात आलेल्या एका चलचित्राद्वारे (व्हिडिओद्वारे) स्वामीजींनी हे आवाहन केले आहे.