जळगाव जिल्ह्यात आयोजित केलेल्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाला धर्मप्रेमींचा मिळालेला उत्तम प्रतिसाद !

‘जळगाव जिल्ह्यात २ ठिकाणी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्यात आले. या वर्गाला श्रीकृष्णकृपेने मिळालेला प्रतिसाद, त्यातून विहंगम प्रसारमार्गाची मिळालेली दिशा, देवाने घेतलेली काळजी आणि शिकायला मिळालेली सूत्रे गुरुचरणी अर्पण करत आहे.

 

श्री. हर्षद खानविलकर

१. ‘स्वरक्षण प्रशिक्षणवर्गा’च्या संदर्भात धर्मप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणे

यावल येथील हिंदु राष्ट्रजागृती सभा झाल्यावर तेथील धर्मप्रेमींकडून ‘स्वरक्षण प्रशिक्षण वर्गा’च्या संदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वर्गाला येण्यासाठी युवकांनी त्वरित सिद्धता दाखवली. त्यानुसार देवाच्या कृपेने नियोजनही लगेच झाले.

२. गावातच धर्मप्रेमींच्या समवेत राहून ‘स्वरक्षण प्रशिक्षणवर्गा’चे आयोजन करण्याविषयी वाटणे आणि देवानेच मनाची सिद्धताही करवून घेणे

यावल तालुका जळगावपासून ४५ कि.मी.वर आहे. प्रतिदिन जाऊन-येऊन करायचे म्हटले, तर प्रवासातच पुष्कळ वेळ जाणार होता. त्यामुळे ‘आपण जर गावात राहिलो, तर धर्मप्रेमींशी संपर्क, सहवास आणि चांगली जवळीक होऊ शकते’, असे मला वाटले. गावातच धर्मप्रेमींच्या समवेत रहाण्याविषयीचा विचार झाला. त्या वेळी देवाच्या कृपेने माझ्या मनात कोणताही नकारात्मक विचार आला नाही. असे नियोजन मी यापूर्वी कधी केले नव्हते. त्यामुळे ‘देवाने मला शिकण्यासाठी चांगली संधी दिली आहे’, असा विचार करून त्यानेच मनाची सिद्धता करवून घेतली.

३. साधक अनोळखी असूनही केवळ हिंदु जनजागृती समितीवरील विश्‍वासामुळे गावातील धर्मप्रेमींनी साधकाच्या रहाण्याचे चांगले नियोजन करणे

साखळी येथील स्थानिक धर्मप्रेमींनीच माझ्या रहाण्याचे चांगले नियोजन केले. मी अनोळखी असूनही केवळ हिंदु जनजागृती समितीवरील विश्‍वास आणि स्थानिक समितीसेवकांनी केलेली जवळीक यांमुळे त्यांनी आनंदाने पुष्कळ चांगले नियोजन केले होते. ‘गावात असूनही माझी गैरसोय होणार नाही’, याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला होता.

४. दोन ठिकाणी स्वरक्षण वर्ग चालू करणे आणि त्याला देवाच्या कृपेने चांगला प्रतिसाद मिळणे

यावल आणि साखळी या ठिकाणी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग’चालू करण्यात आला. सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत यावल येथे आणि रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत साखळी येथे वर्ग चालू झाले. या वर्गांना यावल येथे सरासरी १५ जण आणि साखळी येथे सरासरी ४५ युवक नियमित उपस्थित होते. मुलांना पहिल्या दिवशीच वर्गाची वेळ सांगितली. परत त्यांना जमवण्यासाठी फारसा पाठपुरावा करावा लागला नाही. ठरलेल्या वेळेत येण्याचा ते प्रयत्न करायचे. देवाच्याच कृपेने हा प्रतिसाद मिळत होता.

५. स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाच्या समवेत देवाने करवून घेतलेले इतर प्रयत्न

अ. प्रतिदिन वर्ग झाल्यावर मी १ – २ धर्माचरणाच्या कृती, नामजपाचे महत्त्व आणि हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व अशा प्रकारे वेगवेगळे विषय सांगायचो. त्यामुळेही मुलांना वर्गाला यायला आवडायचे आणि त्यानुसार काहींनी प्रयत्नही चालू केले.

आ. गावातील मुलांना माझ्या रहात्या खोलीवर बोलावून त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाविषयी माहिती आणि त्याचे महत्त्व सांगणे

इ. वेगवेगळ्या धर्मप्रेमींच्या घरी दुपारी आणि रात्री भोजनासाठी जाणे, तसेच त्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांशी बोलणे, त्यांना साधना सांगणे आणि जवळीक साधण्यासाठी प्रयत्न करणे

ई. सकाळच्या वेळेमध्ये धर्मप्रेमी मुलांच्या घरी चहासाठी जाणे आणि त्यांच्याशी अनौपचारिक बोलणे

उ. जी मुले पुढील काळात साधनेसाठी सिद्ध होऊ शकतात किंवा ज्यांचा प्रतिसाद आणि सहभाग चांगला आहे, त्यांच्याशी वैयक्तिक जवळीक साधणे

ऊ. ‘प्रत्येक युवक सध्या व्यवहारिक जीवनात काय काय करतो ?’, हे लक्षात घेऊन त्यानुसार अनौपचारिक बोलून त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे

६. देवाच्या कृपेने आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदाने रहाता येणे आणि ‘आपत्काळाच्या दृष्टीने देव सिद्धता करवून घेत आहे’, असे जाणवणे

मी रहात असलेल्या ठिकाणी केवळ अंघोळीची व्यवस्था होती. गावात पुरुषांसाठी शौचालयाची व्यवस्था नव्हती. प्रयत्न करूनही माझ्यासाठी स्नानगृह आणि शौचालय अशी दोन्ही सोय असणारी खोली उपलब्ध झाली नाही. देवाच्या कृपेने माझ्या मनात ‘अशी सोय नाही, तर आपले कसे होणार ?’, असा विचार आला नाही. देवाच्या कृपेने मला आहे ती परिस्थिती आनंदाने स्वीकारता आली. तेव्हा ‘देवच पुढच्या आपत्काळाच्या दृष्टीने सिद्धता करवून घेत आहे’, असे मला वाटले.

७. ‘धर्मप्रेमींच्या माध्यमातून देव किती काळजी घेतो !’, हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळणे

अनोळखी गावात रहात असूनही मला एकही दिवस तसे वाटले नाही. घरचेही आपली एवढी काळजी घेऊ शकणार नाहीत, तेवढे प्रेम त्या धर्मप्रेमींनी दिले. ‘आम्ही सगळे पुष्कळ वर्षांपासून एकत्र आहोत’, असेच वाटत होते. निवासाला लागणारे साहित्य, वेगवेगळ्या प्रकारचे जेवण, यांचे त्यांनी चांगले नियोजन केले होते. स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ असेल, तर तेही मला खाऊ घालायचे. देवाच्या कृपेने ‘काही अल्प पडले’, असे झालेच नाही. त्या वेळी ‘देव माझी किती काळजी घेत आहे !’, हे मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. त्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

८. स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाची फलनिष्पत्तीही चांगली असणे

स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग झाल्यावर लगेच या ठिकाणी एक दिवसाच्या कार्यशाळाही घेण्यात आल्या. त्यांनाही देवाच्या कृपेने चांगला प्रतिसाद मिळाला. यातील काही जण स्थानिक सेवेमध्येही त्यांच्या वेळेनुसार सहभागी होत आहेत.

९. ‘सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्यावर खोटे आरोप होत असूनही समाजात त्यांच्याविषयीचा विश्‍वास न्यून झाला नसून तो वाढला आहे’, असे जाणवणे

‘सध्या सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्यावर खोटे आरोप होत आहेत; पण समाजातील त्यांच्यावरील विश्‍वास वाढतच आहे’, असे मला जाणवले. त्या गावातील काही मुले गेल्या अनेक वर्षांपासून हिंदु राष्ट्र-जागृती सभांना जळगाव येथे येत होते. हिंदु राष्ट्र-जागृती सभांमध्ये जे धर्माचरण आणि साधनेचे विषय सांगितले जायचे, त्यानुसार ते आचरण करायचे अन् गावातही त्यांनी प्रसार केला होता. त्याचप्रमाणे ‘एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्‍वास ठेवून एवढे नियोजन करणे आणि सांभाळणे’, ही गुरुकृपा अन् सनातन संस्था, तसेच हिंदु जनजागृती समितीवरचा विश्‍वास नाही, तर काय आहे ?

१०. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने पात्रता नसतांना देव एवढे भरभरून शिकवत आहे आणि अनुभवायला देत आहे’, यासाठी भगवान श्रीकृष्ण अन् परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त करतो. मी अजून अत्यल्प पडत आहे. ‘देवानेच आमच्याकडून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने झोकून देऊन आणि गुरुदेवांना अपेक्षित प्रयत्न शेवटच्या श्‍वासापर्यंत करवून घ्यावेत’, अशी प्रार्थना आहे.’

– श्री. हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती. (११.७.२०१९)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक