पत्नीला सर्वतोपरी साहाय्य करणारे आणि कृतज्ञताभाव असणारे अंबरनाथ, ठाणे येथील श्री. राजेंद्र रघुनाथ कुलकर्णी !
१. नियमितपणे व्यायाम करणे
‘माझे यजमान नियमित व्यायाम करून स्वतःला सुदृढ ठेवतात. ते व्यायाम करण्यात खंड पडू देत नाहीत. ‘देवाने दिलेले शरीर सुदृढ ठेवणे’ हे आपले आद्य कर्तव्य आहे’, असे ते मानतात.
२. प्रामाणिकपणे व्यवसाय करणे
ते विद्युत जोडणीची कामे करतात. ते प्रामाणिकपणे व्यवसाय करतात. चालू असलेल्या प्रचलित दराप्रमाणेच ते पैसे घेतात. त्यांना कुणी ‘अधिक पैसे देऊन अयोग्य कृती करायला सांगत असल्यास, उदा. ‘इलेक्ट्रिक मीटर’मध्ये फेरफार करणे, ‘मुख्य वीज जोडणीवरून वीज जोडून देण्यास सांगणे’ ते स्पष्टपणे नकार देतात.
३. आवड-नावड नसणे
यजमानांना खाण्या-पिण्याची किंवा कपड्यांची कसलीच आवड-नावड नाही. मी जसा स्वयंपाक करीन, तो ते आनंदाने आणि गुरुचरणी अर्पण करून, प्रार्थना करून ग्रहण करतात. त्यांना कोणतेही व्यसन नाही.
४. मनाचा मोठेपणा
आमच्या विवाहाला २३ वर्षे पूर्ण होत आली आहेत. मला विवाहापूर्वी ५ वर्षे अर्धांगवायूचा झटका आला होता. माझी डावी बाजू थोडी कमकुवत झाली, तरी त्यांनी माझ्याशी लग्न करून मला स्वीकारले. त्यांनी माझ्या शारीरिक व्यंगाविषयी मला कधीही जाणवू दिले नाही. प्रत्येक कृती करतांना त्यांचे मला नेहमी साहाय्यच होते. ‘तू हे करू शकतेस. तू सर्वसाधारण महिलांसारखीच आहेस’, असे बोलून ते मला सातत्याने प्रोत्साहनही देतात.
५. इतरांचा विचार करणे
विवाहानंतर नोकरीच्या ठिकाणी रेल्वेने प्रवास करण्याचा मला पुष्कळ त्रास होत होता. एक दिवस प्रवास करतांना मला धक्का लागून मी रेल्वे फलाटावर पडले. त्यानंतर यजमानांनी लगेचच मला नोकरी सोडायला सांगितले. मी लग्नानंतर केवळ १ वर्षच नोकरी केली. त्यानंतर ते स्वतःच अधिक कष्ट करू लागले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘मी जे मिळवीन, त्यातच आपण आपला उदरनिर्वाह करू आणि सुखा-समाधानाने राहू.’’
६. परिस्थिती स्वीकारणे
त्यांना दिवसभर कितीही कष्ट सोसावे लागले किंवा काम करतांना कोणत्याही परिस्थितीला सामोरे जावे लागले, तरी ते स्थिर असतात. त्यांची समोर आलेली परिस्थिती स्वीकारण्याची सिद्धता असते.
७. व्यवसाय सांभाळून यजमान करत असलेल्या सेवा
अ. ते मला सेवेत पुष्कळ साहाय्य करायचे. यजमान घरी असल्यास ते आमच्या मुलीला (कु. अक्षताला) सांभाळायचे आणि मला सेवेला पाठवायचे. त्या वेळी त्यांना शक्य झाल्यास ते स्वतःही सेवेसाठी येत असत.
आ. त्यांना कन्नड भाषा येते. पूर्वी त्यांनी कन्नड ‘साप्ताहिक सनातन प्रभात’चे वर्गणीदारही केले आहेत. ते स्वतः अंक वितरणाची सेवा करायचे. त्यांनी अंबरनाथ येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाचे दायित्व सांभाळले आहे.
इ. ते सात्त्विक उत्पादनांचे वितरण करतात. ते ग्रंथ प्रदर्शनाच्या ठिकाणी विद्युत जोडणी करण्याची सेवा करतात.
ई. काम करतांना ‘एखाद्या व्यक्तीला साधनेची आवड आहे’, असे त्यांच्या लक्षात आल्यास ते त्यांना साधना सांगतात.
८. पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात जायला अनुमती देणे
‘तुम्ही देवद आश्रमात राहून पूर्ण वेळ साधना करू शकता’, असे मला दायित्व असलेल्या साधिकेने सांगितले. त्या वेळी लगेचच दिवाळी होती; म्हणून मी विचार केला, ‘दिवाळी झाल्यावरच जाऊया.’ मी याविषयी यजमानांना सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘तुला आता बोलावले आहे, तर आताच जायला पाहिजे. दिवाळीचा विचार का करतेस ? तू माझी काही काळजी करू नकोस.’’ त्यांनी स्वतःच मला आणि मुलीला देवद आश्रमात पोचवले.
९. संतांनी केलेले कौतुक
फेब्रुवारी २०१९ मध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी त्यांनी पुष्कळ सेवा केली. त्या वेळी ते उत्साहाने सेवा करत होते. पू. (सौ.) संगीता जाधवकाकूंनी माझ्याकडे त्यांचे पुष्कळ कौतुक केले.
१०. श्रद्धा
१० अ. सनातन संस्थेविषयी श्रद्धा असल्याने पत्नी आणि मुलीला पूर्ण वेळ साधना करण्यासाठी आश्रमात पाठवणे : मी आणि मुलगी देवद आश्रमात राहून साधना करतो. ते स्वतःचा व्यवसाय सांभाळून घरीच स्वतः स्वयंपाक करून जेवतात. आमची आर्थिक स्थिती बेताची असल्याने नातेवाईक आणि समाजातील व्यक्ती ‘तू पत्नी आणि मुलगी यांना आश्रमात सेवेला का पाठवलेस ? त्यांना एखादी नोकरी अथवा व्यवसाय करण्यास का सांगत नाहीस ?’, असे विचारायचे. तेव्हा यजमानांनी त्यांना सांगितले, ‘‘सनातन संस्थेविषयी मला ठाऊक आहे. मी आश्रमात जाऊन सेवाही केलेली आहे. संस्थेच्या कार्याविषयी मला ठाऊक आहे.’’
१० आ. त्यांना व्यवसायात कुणी फसवले किंवा पैसे दिले नाहीत, तरी ते घरी येऊन चिडचिड न करता शांत रहातात. त्या वेळी ते म्हणतात, ‘‘देव आपल्याला अजून दुसरे काम देईल’’ आणि खरोखर तसेच होते. ते व्यवसाय साधना म्हणून करतात.
११. भाव
११ अ. ‘ईश्वराच्या कृपेमुळे हे धन मिळत आहे’, असा भाव ठेवून केलेल्या कामाचे पैसे कृतज्ञतेच्या भावाने स्वीकारणे : त्यांना काम झाल्यावर पैसे देण्यात येतात. तेव्हा ‘ईश्वराच्या कृपेमुळेच हे धन मानधन स्वरूपात मला मिळत आहे’, असा भाव ठेवून ते अतिशय कृतज्ञतापूर्वक पैसे स्वीकरतात. ‘मी केवळ हे पाहिले आहे’, असे नाही, तर काही ओळखीच्या व्यक्तींनीही मला याविषयी सांगितले आहे.
१२. अनुभूती
१२ अ. एकदा यजमान विद्युत जोडणीचे काम करत असतांना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्या वेळी त्यांना काही झाले नाही.
१२ आ. एकदा एका इमारतीच्या वायरिंगचे काम करतांना पुष्कळ उंचावरून, म्हणजे सज्जावरून पडून त्यांचा अपघात झाला. तेव्हाही त्यांना फारसा त्रास झाला नाही.
त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जिवावरच्या अनेक कठीण प्रसंगातून वाचवले असल्याच्या अनुभूती आल्या आहेत.
‘हे गुरुदेवा, या कलियुगात सहनशील, त्यागी, निरपेक्ष वृत्ती असलेले, जिवलग मित्र आणि वडिलांप्रमाणे छत्रछाया देणारे यजमान आपण मला दिलेत’, त्याविषयी मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. प्राची राजेंद्र कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.५.२०१९)