तरुणांच्या मनातील छत्रपती शिवराय !
३१ मार्च २०२१ या दिवशी तिथीनुसार झालेल्या शिवजयंतीच्या निमित्ताने…
‘प्रतिवर्षी महाराष्ट्रात शिवजयंती उत्साहाने साजरी केली जाते. शिवजयंती साजरी करण्यात तरुणांचा सहभाग सर्वाधिक असतो. शिवजयंती जवळ आली की, त्यांच्यातील उत्साह वाढत असतो. एक मासापूर्वीपासूनच ते ‘व्हॉट्सअप’ वर छत्रपती शिवाजी महाराज यांचे ‘स्टेट्स’ वगैरे ठेवायला प्रारंभ करतात. त्यामुळे वातावरण शिवमय होते. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ५ पातशाह्यांशी लढले. त्यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून ‘आतंकवाद कसा संपवावा’, हे सर्वांना दाखवून दिले. हा प्रसंग आठवला, तरी आपल्यातील क्षात्रवृत्ती जागी होते. त्यामुळेच आजही महाराजांची प्रतिमा प्रत्येक मनामनांत जागृत आहे.
महाराजांचा अवमान आणि गडकिल्ल्यांचा र्हास थांबवण्यासाठी शिवभक्तांनी पुढे येणे आवश्यक !
आज प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराज यांना त्याचे दैवत मानतो. काहींच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, तर काहींच्या घरावर भगवाही फडकतांना दिसतो. अनेक जण त्यांच्या हातावर राजे, तलवार यांचे चित्र गोंदवून घेतात, महाराजांसारखी दाढी ठेवतात, तसेच काही जण त्यांच्या वाहनांवर ‘राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या !’, अशा प्रकारचे वाक्यही लिहितात. हे करणे वाईट नाही; पण अनेकदा महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख होतो, त्यांना पाठ्यपुस्तकांतून, समाज माध्यमांतून, मालिका, चित्रपट आणि विज्ञापने यांमधून चुकीच्या पद्धतीने दर्शवले जाते. प्रशासनाला, तर महाराजांनी स्वकष्टाने उभारलेल्या गडकिल्ल्यांंकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही. तेव्हा महाराजांचा अवमान होऊ नये आणि त्यांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचा र्हास होऊ नये, यांसाठी शिवभक्त तरुण मंडळींनी पुढे येणे आवश्यक आहे.
चला, छत्रपती शिवरायांचे मावळे बनूया !
आज विविध माध्यमांतून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अयोग्य इतिहास मांडला जात आहे. तेव्हा त्यांचा खरा इतिहास वाचून त्याचा अनुभव घ्या. येथेच न थांबता हा इतिहास प्रत्येक घराघरात पोचवा. लहान मुलांना महाराजांविषयी गोष्टी सांगा. प्रत्येक घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा सिद्ध झाला पाहिजे. असे कार्य करणे, हीच खरी शिवजयंती असेल. स्वत: आपण शिवाजी होऊ शकत नसलो, तरी बहिर्जी नाईक, बाजीप्रभु देशपांडे, तानाजी मालुसरे अशा अनेक मावळ्यांप्रमाणे कार्य करण्याचा ध्यास घेऊया. महाराजांसाठी स्वत:च्या जिवाची पर्वा न करणारे मावळे त्या काळी होते. त्यांच्यासारखे कार्य करणे, ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. असे कार्य करणार्या शिवभक्ताचा महाराजांनाही अभिमान वाटेल.’
– श्री. संकेत भोवर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.