‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपट : इंग्रजांना आक्रमणकर्ते दाखवण्याऐवजी पेशव्यांना दलितविरोधी दाखवण्याचा प्रयत्न !
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘समाजात तेढ निर्माण करणारा आक्षेपार्ह भाग नाही ना ?’ याविषयी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी !
मुंबई, ३१ मार्च (वार्ता.) – १ जानेवारी १८१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे इंग्रज आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या लढाईच्या इतिहासकालीन घटनेवर रमेश थेटे यांनी निर्मिती अन् दिग्दर्शित केलेला ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ हा चित्रपट १७ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रदर्शित होत आहे. ही लढाई इंग्रज आणि भारतीय यांच्यामध्ये झालेली असतांना चित्रपटात मात्र मागासवर्गीय अन् पेशवे यांच्यामध्ये समानतेच्या हक्कासाठी लढाई झाल्याचे दाखवून पेशव्यांना ‘दलितविरोधी’ दाखवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करण्यात आला आहे.
१ जानेवारी २०१८ या दिवशी झालेल्या कोरेगाव भीमा दंगलीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. राज्यातील सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे याविषयीची संवेदनशीलता लक्षात घेऊन चित्रपट परिनिरीक्षण मंडळ आणि शासन यांनी या चित्रपटात समाजात तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह दृश्ये नाहीत ना ? याविषयी दक्षता घ्यावी, असे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हा चित्रपट किंवा त्याचा ट्रेलर अद्याप प्रदर्शित झालेला नसल्यामुळे ‘चित्रपटात नेमके काय आहे ?’ याविषयी अनुमान लावून तर्क करणे योग्य ठरणार नाही; मात्र चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश थेटे यांनी आतापर्यंत चित्रपटाविषयी केलेले वक्तव्य आणि चित्रपटाचे विज्ञापन यावरून या चित्रपटात आक्रमणकर्त्या इंग्रजांऐवजी पेशव्यांना अत्याचारी दाखवण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
डिसेंबर २०२० मध्ये या चित्रपटाचे ‘पोस्टर’ प्रदर्शित झाले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आला आहे. यामध्ये चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत मनोगत व्यक्त करतांना रमेश थेटे यांनी, ‘हा चित्रपट लोकांना विचार करायला प्रवृत्त करील. कोण माणूस आहे आणि कोण हैवान आहे ? कोण मानवतेला महत्त्व देतो आणि कोण अमानवी अत्याचार करतो ? हा चित्रपट अशा व्यवस्थेवर आहे. हे युद्ध आपले अधिकार आणि समानता यांसाठी लढले गेले. हे युद्ध २ सेनांमधील नसून दोन संस्कृतींमधील होते. समता आणि असमानता यांमधील ही लढाई आहे. ५०० महारांनी २८ सहस्र बाजीराव पेशवा सेनेला धूळ चारली होती’, असे म्हटले होते. (या लढाईत तत्कालीन महार म्हणून ओळखला जाणारा समाज इंग्रजांच्या बाजूने लढला. त्यात पेशवे आणि मराठे यांचा पराभव झाला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराजाची भूमी इंग्रजांच्या अधिपत्याखाली आली. या युद्धात जे महार मरण पावले, त्यांच्या स्मरणार्थ इंग्रजांनी कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ उभारला. तो आजही अस्तित्वात आहे. इंग्रजांच्या या कुटील डावाने आजही समाजामध्ये दुहीचे वातावरण निर्माण होत आहे. कोरेगाव भीमा येथील दंगल हा त्या घटनेचा आताचा परिणाम होय. त्यामुळे या चित्रपटातून इंग्रजांच्या कूटनीतीला बळी पडून दोन्ही समाजांमध्ये वैमनस्य निर्माण करणारे चित्रीकरण असल्यास ते समाजामध्ये तेढ निर्माण करणारे ठरू शकते. त्यामुळे चित्रपट परिनिरीक्षण मंडळ आणि शासन यांनी या चित्रपटातून समाजामध्ये दुही निर्माण होणार असल्यास त्याविषयी वेळीच लक्ष देणे अपेक्षित आहे ! – संपादक)