तिरुपती मंदिरात दान केल्या जाणार्या केसांची चीनमध्ये होणार्या तस्करीमागे सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेसमधील नेत्यांचा सहभाग !
तेलुगु देसम् पक्षाचे नेते अयन्ना पत्रुदु यांचा आरोप !
मंदिर सरकारीकरणाचे असेही दुष्परिणाम ! आंध्रप्रदेशातील सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस हा ख्रिस्तीधार्जिणा पक्ष असल्याने अशी घटना हिंदूंच्या प्रसिद्ध मंदिराच्या संदर्भात घडत असेल, तरी केंद्र सरकारने याची चौकशी करून सत्य उघडकीस आणले पाहिजे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
अमरावती (आंध्रप्रदेश) – तिरुपती मंदिरातील भक्तांकडून अर्पण केल्या जाणार्या केसांची चीन, थायलंड आणि म्यानमार या देशांमध्ये तस्करीद्वारे विक्री केली जात आहे. यामागे वाय.एस्.आर्. काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांचा हात आहे, असा आरोप राज्याचे माजी मंत्री आणि तेलगु देसम् पक्षाचे नेते अयन्ना पत्रुदु यांनी केला आहे. मिझोराम-म्यानमार सीमेवर तैनात असलेल्या आसाम रायफल्सच्या सैनिकांनी नुकतेच २ कोटी रुपये किमतीचे माणसांचे केस जप्त केले होते.
अयन्ना पत्रुदु यांनी म्हटले की,
१. वाय.एस्.आर्. काँग्रेसचे नेते रेती, सिमेंट आणि दारू यांसमवेत केसांचीही तस्करी करत असून यांची माफीया गँग उघडकीस आली आहे. तिरुपती मंदिरातील केस हे प्रथम म्यानमारला पाठवले जातात. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी ते थायलंड आणि चीनला पाठवले जातात. या केसांचा उपयोग ‘विग’ बनवण्यासाठी केला जातो आणि याचा व्यापार संपूर्ण जगभरात पसरला आहे. या संपूर्ण प्रकारावर जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने स्पष्टीकरण द्यायला हवे. केस माफिया टोळीवर अंकुश ठेवण्यात सरकार अपयशी का ठरत आहे ?
२. भक्तांनी दान केलेल्या केसांच्या तस्करीला साहाय्य करून वाय.एस्.आर्. काँग्रेसच्या नेत्यांनी हिंदूंच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. जगभरातून लाखो भाविक येथे येत असतात. देवावरील श्रद्धेपोटी ते त्यांचे केस दान करत असतात; मात्र सत्ताधारी पक्षाचे नेते मंदिराच्या प्रतिमेला ठेच पोचवण्याचे काम करत आहेत.
तिरुपती मंदिर ट्रस्टने आरोप फेटाळले !
तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टने केसांच्या तस्करीच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. तिरुपती मंदिर ट्रस्टचे अधिकारी ए.वी. धर्म रेड्डी यांनी सांगितले की, तिरुपती मंदिराने भक्तांनी दान केलेल्या केसांच्या स्टोरेज, प्रोसेसिंग, हँडलिंग आणि ट्रान्सपोर्टेशन यांसाठी योग्य नियमावली अन् प्रणाली सिद्ध केली आहे. यात कोणत्याही चुकीच्या कृत्याची शक्यताच नाही.