संचारबंदीचा आदेश धार्मिक कार्यक्रम आणि पारंपरिक शिमगोत्सव यांना लागू नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
पणजी, ३० मार्च (वार्ता.) – राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी धार्मिक कार्यक्रम आणि पारंपरिक शिमगोत्सव यांना लागू नाही, तसेच संचारबंदीचा आदेश खासगी ठिकाणी केलेल्या एखाद्या कार्यक्रमाला लागू नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत दिली. संचारबंदीचा आदेश गावस्तरावर होत असलेल्या शिमगोत्सवाला लागू होणार नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले. राज्यात होळीच्या निमित्ताने समुद्रकिनारपट्टीत हॉटेल आणि क्लब यांनी मोठ्या प्रमाणावर पार्ट्यांचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर समाजातून उपस्थित होत असलेल्या प्रश्नावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘संचारबंदीचा आदेश हा सार्वजनिक रस्ता आणि इतर सार्वजनिक ठिकाणी लागू आहे. कोरोना महामारीच्या सर्व नियमांचे पालन करून खासगी ठिकाणी लोक कार्यक्रम करू शकतात.’’